Atal Bihari Vajpayee :नेहरू म्हणाले होते, हा मुलगा एक दिवस पंतप्रधान होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 05:07 AM2018-08-17T05:07:39+5:302018-08-17T05:07:46+5:30
नेहरू खरोखर द्रष्टे होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. नंतर ते १९९८ मध्ये १३ महिन्यांसाठी आणि १९९९ मध्ये पूर्ण पाच वर्षांसाठी पंतप्रधान बनले.
विरोधकांचा सन्मान करण्याचा तो काळ होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा दिल्याचे सर्वविदित आहेच; पण त्याही आधी इंदिरा गांधी यांचे पिता आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी वाजपेयी यांच्या बाबतीत ‘हा मुलगा एक दिवस भारताचा पंतप्रधान बनेल’, असे वक्तव्य केले होते.
वाजपेयी हे तत्कालीन भारतीय जनसंघाचे (हाच जनसंघ नंतर भाजपात रूपांतरित झाला.) काम करीत होते. जनसंघाला फार अस्तित्व नव्हते. काँग्रेसचा सगळीकडे बोलबाला होता आणि नेहरू काँग्रेसचे निर्विवाद नेते होते. जनसंघाचे नेतृत्व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे होते. पत्रकार असलेले वाजपेयी मुखर्जी यांचे राजकीय सचिव बनले. काश्मीरच्या मुद्यावरून जनसंघाने काँग्रेसला तीव्र विरोध चालविला होता. आंदोलन सुरू होते. १0 मे १९५३ रोजी मुखर्जी यांना जम्मू-काश्मीरच्या सीमेवर अटक करून श्रीनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेव्हा मुखर्जी यांनी वाजपेयी यांना आपला दूत म्हणून दिल्लीला पाठविले. दिल्लीत त्यांनी आपले वाक्चातुर्य पणाला लावून मुखर्जी यांची बाजू मांडली. २३ जून १९५३ रोजी मुखर्जी यांचा तुरुंगातच रहस्यमय मृत्यू झाला. तेव्हा वाजपेयी यांच्यावरील जबाबदारी वाढली. तेव्हा त्यांचे वय होते अवघे २८ वर्षे. या तरुण वयातही त्यांनी मुखर्जी यांचा संदेश सरकार आणि जनतेच्या दरबारात अत्यंत प्रभावीपणे मांडली. तरुण वाजपेयी यांनी नेहरूंचेही लक्ष वेधून घेतले.
१९५७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून विजय मिळवून वाजपेयी लोकसभेत पोहोचले. लोकसभेत त्यांच्या भाषणांनी ज्येष्ठ सदस्यांनाही भुरळ घातली. त्या काळातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची नेतेमंडळीही वाजपेयींच्या भाषणांच्या प्रेमात पडली. नेहरूंचाही त्याला अपवाद नव्हता. एकदा एक विदेशी शिष्टमंडळ भारतभेटीवर आले होते. देशाचे प्रमुख या नात्याने भारतीय नेत्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी स्वत: नेहरूंनी पार पाडली. वाजपेयी यांची शिष्टमंडळाशी ओळख करून देताना नेहरू म्हणाले की, ‘धीस यंग मॅन वन डे विल बिकम द कंट्रीज प्राईम मिनिस्टर...’ (हा तरुण मुलगा एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनेल.)
नेहरू खरोखर द्रष्टे होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. नंतर ते १९९८ मध्ये १३ महिन्यांसाठी आणि १९९९ मध्ये पूर्ण पाच वर्षांसाठी पंतप्रधान बनले.