आणि... एक महाकाव्य संपले; राज ठाकरे यांची वाजपेयींना चित्रातून श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 05:30 PM2018-08-17T17:30:40+5:302018-08-17T17:34:31+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका चित्रामधून अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला.
राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, लालकृष्ण आडवाणी, अमित शहा आणि तिन्ही सेनादल प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच, त्यांना 300 जवानांनी अखेरची मानवंदना दिली. अनेक पक्षांचे नेते, भाजप कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. वाजपेयी यांच्या निधनानंतर जगभरातून विविध नेत्यांनी आपले शोकसंदेश पाठवले आहेत. भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका चित्रामधून वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
यमुनातिरी वाजपेयी यांचे स्मृतिस्थळ
यमुनातीरी सर्व प्रमुख नेत्यांच्या समाध्या असून, तिथेच अटलबिहारी वाजपेयी यांची समाधी आणि स्मृतिस्थळ उभारण्यासाठी यूपीएच्या काळातील कायदा बदलला जाणार आहे. यमुनातीरी यापुढे कोणत्याही नेत्याचे समाधीस्थळ होऊ नये, असा निर्णय आधी घेण्यात आला होता. त्यासाठी शहरी विकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. हे समाधीस्थळ राजघाटाच्या मागेअसू शकेल. ते अटल स्मृतिस्थळ, अटलघाट किंवा अटल किनारा नावाचे असेल. या प्रकरणी सरकारला विरोधक सहकार्य करतील, अशी भाजपाची अपेक्षा आहे. वाजपेयी यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची कारकीर्द पाहिली होती.