लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी
By admin | Published: September 2, 2014 01:43 PM2014-09-02T13:43:36+5:302014-09-02T13:52:34+5:30
उत्तरप्रदेशमधील वैश्य समाजाने लव्ह जिहादला रोखण्यासाठी समाजातील शाळकरी मुलींच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. २ - उत्तरप्रदेशमधील वैश्य समाजाने लव्ह जिहादला रोखण्यासाठी समाजातील शाळकरी मुलींच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरीभागातील व्यापारी वर्गाचा समावेश असलेल्या वैश्य समाजासारख्या सधन आणि सुशिक्षित समाजाने असे निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आग्रा येथे नुकतीच अखिल भारतीय वैश्य एकता परिषद पार पडली असून या परिषदेला केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा हेदेखील उपस्थित होते. या परिषदेत लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी एक अजब निर्णय घेण्यात आला. यानुसार समाजातील शाळकरी मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवातीला आग्रा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यात उत्तरप्रदेशमधील अन्य शहरांमध्ये केली जाणार आहे. याविषयी माहिती देताना वैश्य समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुमंत गुप्ता म्हणाले, मोबाईल आणि इंटरनेटमुळे तरुण मुली लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये फसतात. लव्ह जिहादमध्ये वैश्य समाजातील काही मुली फसल्याने आम्हाला वेळीच दक्षता बाळगणे गरजेचे होते.
शाळकरी मुलींच्या मोबाईल फोनवापरावर निर्बंध घालण्यासाठी आम्ही तरुण आणि महिलांचे समुपदेशन पथक स्थापन करु. हे पथक मुलींना मोबाईल आणि इंटरनेट वापराचे दुष्परिणाम सांगतील. मात्र कोणत्याही मुलीवर मोबाईल फोन न वापरण्यासाठी सक्ती केली जाणार नाही असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. याशिवाय लव्ह जिहादी आणि रोडरोमिओंपासून बचाव करण्यासाठी समाजातील मुलींना कराटेचेही प्रशिक्षण देऊ असे गुप्ता यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाचे सरकार समाजातील 'विशिष्ट' धर्माला प्राधान्य देत असून अन्य लोकांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळेच वैश्य समाजाला अशा कठोर उपाययोजना करण्याची वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान, या निर्णयावर उत्तरप्रदेशमधील महिला व मुस्लिम संघटनांनी नाराजी दर्शवली आहे.