गुजरातमध्ये शिवसेनेच्या विजयासाठी 25 रुपयांचा भाव, सट्टेबाजाराची पहिली पसंती भाजपाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 10:21 AM2017-11-27T10:21:09+5:302017-11-27T11:06:33+5:30
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून गुजरातमध्ये भाजपाविरोधी वातावरण दिसत असले तरी सट्टेबाजांनी गुजरातमध्ये विजयासाठी भारतीय जनता पार्टीलाच पहिली पसंती दिली आहे.
अहमदाबाद - सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून गुजरातमध्ये भाजपाविरोधी वातावरण दिसत असले तरी सट्टेबाजांनी गुजरातमध्ये विजयासाठी भारतीय जनता पार्टीलाच पहिली पसंती दिली आहे. गुजरातमध्ये भाजपा 118 ते 120 जागा जिंकेल तर काँग्रेसला 80 जागांवर समाधान मानावे लागेल असा सट्टेबाजाराचा अंदाज आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत. हिंदुस्थान टाइम्सने सट्टाबाजारातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
भारतात सट्टेबाजी बेकायदा असली तरी महत्वाच्या घटनांवर मोठया प्रमाणात सट्टा खेळला जातो. क्रिकेट सामने, निवडणूका आणि पावसाची तारीख यावर भारतात सट्टेबाजी चालते. निवडणूक विश्लेषक, मीडिया यांच्याप्रमाणे सट्टेबाजांकडेही संभाव्य निकाल काय लागू शकतात याबद्दल चांगली माहिती असते. मुंबई आणि गुजरातमधील सट्टेबाजांनुसार गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर 1 हजार कोटींचा सट्टा लागला आहे.
गुजरातमध्ये पून्हा भाजपाला सत्ता मिळेल पण 2012 पेक्षा कमी जागा मिळतील. भाजपा 118 ते 120 जागा जिंकेल असा सट्टेबाजाराचा अंदाज आहे. भाजपा नेते खासगीमध्येही हाच आकडा सांगत आहे. गुजरातमध्ये मागच्या 22 वर्षांपासून भाजपा सत्तेमध्ये आहे. भाजपाच्या विजयावर सट्टेबाज 1 रुपयावर 1 रुपये 25 पैशांचा भाव देत आहेत तर काँग्रेसच्या विजयासाठी 1 रुपयावर 3 रुपये भाव चालू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला काँग्रेसवर 1 रुपयावर सात रुपये भाव चालू होता. पण काँग्रेसने आता प्रचारात ज्या पद्धतीने आघाडी घेतलीय त्यामुळे हे अंतर कमी होत चालले आहे.
मतदानाच्या तारखा जवळ येतील तशी ही किंमत बदलत जाईल आणि चित्र अधिक स्पष्ट होईल. काँग्रेस आणि हार्दिक पटेलमध्ये झालेल्या आघाडीवरही सट्टेबाजाराची बरीचशी गणित अवलंबून आहेत. सध्याच्या घडीला भाजपाची सरशी आहे. मोदी मॅजिक कसे चालते त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गुजरातेत भाजपा आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत आहे. आम आदमी पार्टीवर 1 रुपयावर 10 रुपयांचा भाव चालू आहे. शिवसेनेवर गुजरामध्ये 1 रुपयावर 25 रुपयाचा भाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर 1 रुपयावर 30 रुपयाचा भाव चालू आहे.