मोठं षडयंत्र देशासमोर आणणार - अरविंद केजरीवाल

By admin | Published: May 9, 2017 11:54 AM2017-05-09T11:54:13+5:302017-05-09T12:36:54+5:30

देशातील मोठ्या षडयंत्राचं सत्य समोर आणणार, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

A big conspiracy will bring the country - Arvind Kejriwal | मोठं षडयंत्र देशासमोर आणणार - अरविंद केजरीवाल

मोठं षडयंत्र देशासमोर आणणार - अरविंद केजरीवाल

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9 -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यापासून कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि "आप"वर सनसनाटी आरोपांची मालिका सुरू केली आहे. यावर अखेर अरविंद केजरीवाल यांनी आपलं मौन सोडले आहे.  
 
"देशातील मोठ्या षडयंत्राचं सत्य समोर आणणार", अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. विधानसभेमध्ये सौरभ भारद्वाज या षडयंत्राचा पर्दाफाश करणार आहेत, हे सत्य नक्की ऐका, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.  
 
तर दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि "आप"मधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या आम आदमी पार्टीतील निलंबित नेता कपिल मिश्रा आता सीबीआयकडे धाव घेणार आहेत.  या भ्रष्टाचारसंबंधिचे कथित पुरावे मिश्रा सीबीआयकडे सोपवणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. पण, तत्पूर्वी मिश्रांनी "आप"मधील काही नेत्यांच्या परदेश दौ-यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आपच्या पाच नेत्यांनी इतक्या प्रमाणात परदेश दौरा केला आहे की देशाला त्यावर विश्वास बसणार नाही, असा गौप्यस्फोट मिश्रा यांनी केला आहे.  
 
कपिल मिश्रांचा उपोषणाचा इशारा
"आप" नेत्यांच्या भ्रष्टाचारासंबंधीत 211 तक्रारी मिळल्याचा दावा कपिल मिश्रा यांनी केला आहे. जर या नेत्यांनी आपल्या परदेश दौ-यांबाबतची माहिती सार्वजनिक केली नाही तर बुधवारपासून या नेत्यांविरोधात उपोषण सुरू करणार, असा इशारा मिश्रा यांनी दिला आहे. 
 
कपिल मिश्रा यांच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे या सर्व नेतेमंडळींच्या परदेश दौ-याची संपूर्ण माहिती आहे. शिवाय, यासंबंधीचे पुरावे सीबीआयकडे सोपवणार असल्याचंही मिश्रा म्हणाले आहेत.  मुख्यमंत्री केजरीवाल पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे, या कारणामुळे कपिल मिश्रा  "आप" नेत्यांची माहिती सार्वजनिक करत नसल्याचे वृत्त आहे.  
 
काय आहे नेमके प्रकरण?
अरविंद केजरीवाल यांनी 2 कोटी रूपयांची लाच घेतली, असा आरोप करत कपिल मिश्रा यांनी केजरीवालांविरोधात मोर्चा उघडला. सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांचे साडू सुरेंद्र कुमार बंसल यांच्यासाठी 50 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार केला होता, असा आरोपही मिश्रा यांनी केला. तसेच सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत मंगळवारी ( 9 मे)  सीबीआयकडे यासंदर्भातील पुरावे आपण सोपवणार असून, त्याबाबत तक्रार नोंदवणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी सांगितले.  

पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर अडचणींचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाने रविवारी पुढचा अंक गाठला होता. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेल्या कपिल मिश्रांनी थेट केजरीवालांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कपिल मिश्रांना पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षातून निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. कपिल मिश्रा यांनी रविवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 
 
दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, असा आरोप करत मिश्रांनी खळबळ उडवून दिली होती. केजरीवाल मंत्रिमंडळात काम करताना अनेक गैरप्रकार आढळून आले. याबाबत मी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना निवेदन दिल्याचे मिश्रांनी म्हटले होते. केजरीवाल आता पूर्वीसारखे राहिले नसून मुख्यमंत्री पदाने त्यांना बदलले आहेत, असे मिश्रा यांनी म्हटले होते. 
 
आपने कपिल मिश्रांचे आरोप फेटाळून लावत मिश्रा हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे कपिल मिश्रा यांनी रविवारीच भाजपामध्ये जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. सोमवारीदेखील मिश्रा यांनी "आप"वर निशाणा साधला होता. केजरीवाल यांच्यावर आरोप केल्यावर मला धमक्यांचे मेसेजेस आणि कॉल येत आहेत. माझी पक्षातून हकालपट्टी करुन दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले होते. मी भाजपा आणि नरेंद्र मोदींचा विरोधक असून मी भाजपाची भाषा बोलत असल्याच्या आरोपात तथ्य नाही, असे मिश्रांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी सकाळी सीबीआयकडे तक्रार करणार असून सीबीआयसमोर प्रत्यक्ष साक्षीदारही हजर करु, असे मिश्रांनी म्हटले होते.
 
 

Web Title: A big conspiracy will bring the country - Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.