नोएडात भाजप नेत्याची हत्या
By admin | Published: June 8, 2014 12:29 PM2014-06-08T12:29:13+5:302014-06-08T12:29:23+5:30
उत्तरप्रदेशमधील नोएडा येथील भाजप नेते विजय पंडीत यांची बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
Next
ऑनलाइन टीम
नोएडा, दि. ८ - उत्तरप्रदेशमधील नोएडा येथील भाजप नेते विजय पंडीत यांची बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर नोएडा येथे तणावाचे वातावरण असून संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी गाड्यांची तोडफोडही केली आहे.
नोएडातील दादरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष गीता पंडीत यांचे पती व भाजप नेते विजय पंडीत शनिवारी रात्री जीटी रोड येथील शिवमंदिर धर्मशाळेजवळील दुकानात बसले होते. या दरम्यान दोन बाईकवरुन तीन तरुण तिथे पोहोचले. त्यांनी पंडीत यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या व घटनास्थळावरुन धूम ठोकली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंडीत यांचा मृत्यू झाला. भरबाजारात झालेल्या या हत्येनंतर दादरी भागात तणाव निर्माण झाला. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यात सुमारे सहा वाहनांना आग लावण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी परिसरात लाठीमार केला. यादरम्यान पोलिस व जमावात धूमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे.
पंडीत यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान काही गुंडांकडून धमक्या आल्या होत्या. पंडीत यांनी भाजपचा प्रचार करु नये यासाठी त्यांना धमकवण्यात आल्याचे पंडीत यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. या धमकीप्रकरणात पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप जमावाने केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर दादरी भागात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.