लालूंच्या मुलाला कानाखाली लगावणा-याला देणार एक कोटींची रोख रक्कम, भाजपा नेत्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 04:01 PM2017-11-24T16:01:00+5:302017-11-24T16:16:02+5:30
पाटणा भाजपा युनिटचे मीडिया इनचार्ज अनिल साहनी यांनी तेज प्रताप यादव यांच्या कानाखाली लगावणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे
पाटणा - बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. तेज प्रताप यादव बोलले होते की, 'मला सुशील मोदी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. जर मी तिथे गेलो तर तिथेच त्यांची पोलखोल करणार'. दरम्यान तेज प्रताप यादव यांच्या धमकीला भाजपानेही त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. पाटणा भाजपा युनिटचे मीडिया इनचार्ज अनिल साहनी यांनी तेज प्रताप यादव यांच्या कानाखाली लगावणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे.
याप्रकरणी जनता दल युनायटेड बिहार युनिटचे प्रवक्ता संजय सिंह बोलले आहेत की, 'तेज प्रताप आपल्या वडिलांची नकल करत होते. त्यांच्यात हिंमत असेल तर सुशील मोदींच्या घरात घुसून दाखवावं. फक्त त्यांच्या अंगात रक्त वाहतंय आणि इतरांच्या पाणी असं नाहीये'.
जेडीयूचे अन्य एक प्रवक्ता निरज कुमार बोलले आहेत की, 'लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला माहिती पाहिजे की हा 1990 चा काळ नाही. बिहारमध्ये आता कायदा - सुव्यवस्था आहे. आमचं तुम्हाला आव्हानच आहे की, तुम्ही सुशील मोदींच्या मुलाच्या लग्नाला यावं आणि काय करु शकता हे दाखवूनच द्या. जिथे शहाबुद्दीन आणि अनंत सिंहसारखे दिग्गज काही करु शकले नाहीत तिथे तुम्ही काय आहात ?'.
दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी सांगितलं आहे की, 'लालू यादव यांनी आपल्या मुलाच्या वक्तव्याची जबाबदारी घेतली पाहिजे. याआधी त्यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बेजबाबदार वक्तव्य केलं होतं, आणि आता तेज प्रताप यादवने वक्तव्य केलं आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे'.