VIDEO: भाजपा मंत्र्याने साजरा केला 59वा प्रजासत्ताक दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 08:13 AM2018-01-27T08:13:23+5:302018-01-27T09:47:03+5:30
शुक्रवारी देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री संदीप सिंह मात्र 10 वर्ष मागे होते
लखनऊ - शुक्रवारी देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री संदीप सिंह मात्र 10 वर्ष मागे होते. अलीगडमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी संदीप सिंह पोहोचले होते. यावेळी त्यांनी देश 59 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असल्याचं म्हटलं आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. संदीप सिंह पहिल्यांदाच अलीगडमधील अतरौली येथूल आमदार म्हणून निवडून आले आहेत, आणि पहिल्यांदाच त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं आहे. ते 26 वर्षांचे आहेत. तसंच योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. ब्रिटनमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. संदीप सिंह यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे ते नातू आहेत.
#WATCH Aligarh: Uttar Pradesh Minister(MoS Education) says "'we are celebrating India's 59th #Republicday" pic.twitter.com/m1VKuIcOhd
— ANI UP (@ANINewsUP) January 26, 2018
शुक्रवारी 26 जानेवारीला देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्विकारले आणि 1950 पासून ते अंमलात आणले गेले. त्याचमुळे हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. दिल्लीमधील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजय चौकावर तिरंगा फडकावला. यावेळी प्रजासत्ताक दिनाची परेड जवळपास 90 मिनिटं चालू होती. यावेळी प्रजासत्ताक दिनासाठी आशियान देशांचे प्रमुख उपस्थित होते.