गौरी लंकेश हत्येत सहभागाचा आरोप करणाऱ्या गुहांना भाजपाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 02:51 AM2017-09-12T02:51:31+5:302017-09-12T02:52:56+5:30
बंगळुरु, दि. १२ - गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपाने आता नोटीस बजावली आहे. लंकेश यांच्या हत्योमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना केला होता.
रानचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांंधी यांनीही आरोप पुराव्यासकट करावेत, असे भाजपाने म्हटले आहे. लंकेश यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरोधात बोलणार्या प्रत्येकावर दबाव आणला जातो किंवा मारझोड केली जाते किंवा सरळ संपवलेही जाते असे वक्तव्य केले होते. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खासदार बी.एस. येडियुरप्पा यांनी जर आपले आरोप सिद्ध करणारे पुरावे राहुल यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सरळ समोर मांडावेत असे आवाहन गांधी यांना केले आहे.
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांमध्ये ८ सप्टेंबर रोजी टीका केली होती. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या बंगळुरु येथिल राहत्या घरी मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर मारेकरी कोण असावेत यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. लंकेश यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.