भाजपाची पहिली यादी : मोदी वाराणसीतून, तर अमित शहा गांधीनगरमधून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 07:07 AM2019-03-22T07:07:37+5:302019-03-22T07:07:51+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह १८४ जणांचा समावेश आहे.

BJP's first list: Modi from Varanasi, Amit Shah from Gandhinagar | भाजपाची पहिली यादी : मोदी वाराणसीतून, तर अमित शहा गांधीनगरमधून

भाजपाची पहिली यादी : मोदी वाराणसीतून, तर अमित शहा गांधीनगरमधून

Next

- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह १८४ जणांचा समावेश आहे.
गुजरातमधील गांधीनगर या पारंपरिक मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे नाव जाहीर झाल्याने पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या अडवाणींचे युग संपल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलेल्या २० राज्यांतील १८४ जणांच्या या यादीत नरेंद्र मोदी (वाराणसी) नितीन गडकरी (नागपूर), राजनाथ सिंह (लखनऊ), डॉ. सत्यपाल सिंह (बागपत), हेमा मालिनी (मथुरा), व्ही. के. सिंग (गाझियाबाद), साक्षी महाराज (उन्नाव), स्मृती इराणी (अमेठी), रावसाहेब दानवे (जालना) अशा प्रमुख नावांचा समावेश आहे. या यादीत विद्यमान २४ खासदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. बिहारमधील १७ उमेदवारांची नावेही पक्षाने निश्चित केली असली, तरी ती तेथील युतीच्या उमेदवारांसोबत जाहीर केली जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली.

नगरमधून सुजय विखे, लातूरमधून सुधाकर शृंगारे

भाजपाच्या पहिल्या यादीत राज्यातील १६ उमेदवारांचा समावेश असून नुकतेच भाजपात दाखल झालेले सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून आणि सुधाकर शृंगारे यांना लातूरमधून संधी देण्यात आली आहे. ते वगळता राज्याच्या यादीत बदल झालेले नाहीत. वर्ध्यातून माजी मंत्री दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र यादीत तडस यांचेच नाव कायम राहिले.

भाजपाचे राज्यातील उमेदवार

नंदुरबार- हीना गावित, धुळे - सुभाष भामरे, रावेर - रक्षा खडसे, अकोला - संजय धोत्रे, वर्धा - रामदास तडस, नागपूर - नितीन गडकरी, गडचिरोली-चिमूर - अशोक नेते, चंद्रपूर - हंसराज अहिर, जालना - रावसाहेब दानवे, मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन, भिवंडी - कपिल पाटील, अहमदनगर - सुजय विखे पाटील,
बीड - डॉ. प्रीतम मुंडे, लातूर - सुधाकर शृंगारे, सांगली - संजयकाका पाटील.

१४ खासदारांवर भाजपाने टाकला पुन्हा विश्वास

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील ज्या १६ उमेदवारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली त्यात दोघे वगळता १४ विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (नागपूर), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना), केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर), सुभाष भामरे (धुळे) यांच्यासह १४ विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून अपेक्षेप्रमाणे डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. लातूरमध्ये विद्यमान खासदार सुनील गायकवाड विरुद्ध पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर या संघर्षात गायकवाड यांचा पत्ता कापला गेला. तेथे निलंगेकर यांचे समर्थक सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शृंगारे हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत.

सांगलीमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यास मतदारसंघातील भाजपाच्या आमदारांनी विरोध केला होता, तरीही पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची समजूत काढत पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला. गडचिरोलीमधून विद्यमान खासदार अशोक नेते त्यांचा पत्ता कापणार अशी जोरदार चर्चा असताना पक्षाने मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ज्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे, असे उत्तर पूर्व मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. मात्र मुंबईत भाजपच्या वाट्याला आलेल्या अन्य दोन जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात मुंबई उत्तरमध्ये गोपाळ शेट्टी आणि मुंबई उत्तर-मध्यमधील पूनम महाजन यांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये पुन्हा एकदा विद्यमान खासदार कपिल पाटील यांना संधी देण्यात आली.

अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना पुन्हा उमेदवारी देत भाजपाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवा मध्यंतरी पसरवण्यात आल्या होत्या.त्या केवळ अफवा असून आपण निवडणुकीसाठी सज्ज झालो आहोत, असे धोत्रे यांनी स्पष्ट केले होते.

रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पक्षाने सांभाळून घेतले आहे. रक्षा या खडसे यांच्या स्नुषा आहेत. वर्ध्यातून माजी मंत्री दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र यादीत तडस यांचेच नाव कायम राहिले.

पहिल्या टप्प्यातील एक, दुसऱ्यातील दोन उमेदवार बाकी
ज्या मतदारसंघांमधील उमेदवार ठरवणे ही बाब भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहे तिथे अजूनही उमेदवार निश्चित होऊ शकलेले नाहीत. त्यात पुणे, जळगाव, दिंडोरी, माढा यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्यास १८ ला सुरूवात झाली असली, तरी त्यातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. दुसºया टप्प्यातील अर्ज भरण्यास १९ तारखेला सुरूवात झाली. मात्र त्यातील सोलापूर, नांदेड या मतदारसंघातील उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत.

Web Title: BJP's first list: Modi from Varanasi, Amit Shah from Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.