रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 07:26 PM2017-10-05T19:26:05+5:302017-10-05T19:35:12+5:30
]म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे.
नवी दिल्ली - म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे. त्याबरोबरच आसाममध्ये रोहिंग्यांनी घुसखोरी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आसाममध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
बीएसएसफने पश्चिम बंगालला लागून असलेल्या भारत आणि बांगला देशच्या सीमेवर रोहिंग्या मुस्लिमांची अवैध घुसखोरी रोखण्यासाठी गस्त वाढवली आहे. बीएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण बंगाल) पीएसआर अंजनेयुलू यांनी सांगितले की, "याआधी आम्ही घुसखोरी होण्याची शक्यता असलेली 22 ठिकाणे निश्चित केली होती. आता मात्र या ठिकाणांची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात आली आहेत. ही ठिकाणे संवेदनशील आहेत. या ठिकाणांहून बांगलादेशी आणि रोहिंग्या, दोघेही सीमा पार करून भारतात घुसखोरी करू शकतात, त्यामुळे आम्ही, गस्त वाढवली आहे."
बीएसएफने संवेदनशील घोषित केलेल्या क्षेत्रांमध्ये पेत्रापोल, जयंतीपूर, हरिदासपूर, गोपालपारा आणि तेतुलबेराई यांचा समावेश आहे. दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांत 175 रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यातील सात रोहिंग्यांना याचवर्षी अटक करण्यात आली आहे. रोहिंग्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी बीएसएफकडून आपल्या स्थानिक सूत्रांमध्ये वाढ करण्यात येत आहे. तसेच विविध केंद्रीय यंत्रणांसोबत बीएसएफ काम करत आहे.
भारताची बांगलादेशला लागून असलेली एकूण सीमा 4 हजार 096 किमी एवढी आहे. त्यापैकी तब्बल 2 हजार 216 मीटर सीमा एकट्या पश्चिम बंगालला लागून आहे. रोहिंग्या निर्वासितांबाबत सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडताना केंद्र सरकारने त्यांचा उल्लेख अवैध प्रवासी असा केला होता. तसेच त्यांचे भारतात येऊन वास्तव्य करणे देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितसे होते.
बंगालप्रमाणेच आसाममध्येही रोहिंग्या निर्वासितांची अवैध घुसखोरी रोखण्यासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आसाम पोलिसांनी हायअलर्टची घोषणा केली आहे. रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या तीन भारतीय दलालांना त्रिपुरामधील सोनापूर येथे अटक करण्यात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याआधी आसाम त्रिपुरा सीमेवर सहा संशयित रोहिंग्यांना ताब्यात घेण्यात आले होते.