कांडला बंदराला दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यास कॅबिनेटची मंजूरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 12:47 PM2017-10-04T12:47:05+5:302017-10-04T12:50:59+5:30
भारतीय बंदरे कायदा 1908 नुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने 25 सप्टेंबरपासून यां बंदराचे नाव बदलत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे कांडला पोर्ट ट्रस्टही आता दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट या नावाने ओळखले जाणार आहे.
नवी दिल्ली, दि.4- गुजरातमधील कांडला बंदरास पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दीच्या निमित्ताने या वर्षी 25 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी गुजरातमधील कांडला बंदराचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. आता केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
भारतीय बंदरे कायदा 1908 नुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने 25 सप्टेंबरपासून यां बंदराचे नाव बदलत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे कांडला पोर्ट ट्रस्टही आता दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट या नावाने ओळखले जाणार आहे. कांडला बंदरातील 933 कोटींच्या विविध कामांच्या कोनशिला समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कांडला बंदरास पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे असी इच्छा व्यक्त केली होती. दीनदयाळ नेहमीच गरिबांसाठी उभे ठाकले, त्यांचं कार्य गरीब आणि समाजातील दबलेल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करण्यासाठी आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहिल असे पंतप्रधान मोदी त्या कार्यक्रमात म्हणाले होते.
Union Cabinet gives ex-post facto approval for renaming of Kandla port as #Deendayal Port
— ANI (@ANI) October 4, 2017
कांडला बंदर महाराव खेंगर्जी यांच्या प्रयत्नांमधून 1931 साली उभे राहिले होते. कालांतराने या बंदरातून मालवाहतुकीचे प्रमाण वाढत गेले आणि गुजरातमधून मालवाहतूक करणाऱ्या बंदरांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. कांडला बंदरातून 10 कोटी टन कार्गोचा व्यापार झाल्याने एक नवा विक्रमही स्थापन झाला. कच्छच्या आखातात बांधलेले हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे बंदर मानले जाते.