मंत्रिमंडळ विस्तार : अनेक खात्यांत खांदेपालट; कामगिरी, क्षमतेवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:59 AM2017-09-04T01:59:22+5:302017-09-04T06:14:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासोबत अनेक खात्यांमध्ये खांदेपालटही केला. त्यानुसार, निर्मला सितारामन यांच्याकडे संरक्षण तर पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासोबत अनेक खात्यांमध्ये खांदेपालटही केला. त्यानुसार, निर्मला सितारामन यांच्याकडे संरक्षण तर पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाबरोबर कौशल्य विकास मंत्रालयाचा कार्यभार आला, तर मुख्तार अब्बास नकवींकडील अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाला कॅबिनेट दर्जा बहाल करण्यात आला आहे.
नितीन गडकरी यापुढे परिवहन व नौकानयन मंत्रालयाखेरीज उमा भारती यांच्याकडील जल संसाधन, नदी विकास तथा गंगा संरक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहतील. काहीशी पदावनती झालेल्या उमा भारती शपथविधीला उपस्थित नव्हत्या. मी नाराज नाही. पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे शपथविधीला येऊ शकले नाही, असे त्या म्हणाल्या. रेल्वे मंत्रालयातून पदमुक्त झालेल्या सुरेश प्रभूंकडे आता उद्योग व वाणिज्य मंत्रालय सोपविले आहे. उमा भारती यापुढे फक्त स्वच्छता व पेयजल विभागाचे आणि नरेंद्रसिंग तोमर हे ग्रामविकास व खाण मंत्रालयाचे काम पाहतील.
स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्र्यांमध्ये राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे क्रीडा, गिरीराजसिंग यांच्याकडे कलराज मिश्र यांच्याकडील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, आर. के. सिंग यांच्याकडे ऊर्जा व वैकल्पिक ऊर्जा स्रोत, हरदीपसिंग पुरींकडे नगरविकास व गृहनिर्माण, व अल्फोन्स कन्नाथनम यांच्याकडे पर्यावरण व पर्यटन विभाग स्वतंत्र कार्यभारासह सोपविला आहे. उर्वरित काळात मोदी सरकारच्या कामगिरीचा ठसा उमटविण्याची विशेष जबाबदारी या मंत्र्यांवर आहे.
राज्यमंत्र्यांमध्ये सत्यपाल सिहांकडे मनुष्यबळ विकास, जल संसाधन व नदी विकास, शिवप्रताप शुक्लांकडे वित्त, वीरेंद्रकुमारांकडे महिला व बालविकास, अनंत हेगडेंकडे कौशल्य विकास, अश्विनी चौबेंकडे आरोग्य व कुटुंब कल्याण तर गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद आले आहे. हे सारे मंत्री विविध क्षेत्रांत अनुभवी आहेत. राज्यसभा सदस्य विजय गोयल यांच्याकडे संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्रिपद सोपविले गेले.
प्रभूंचे निरोपाचे ट्विट-
काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास गेलेल्या सुरेश प्रभू यांना पंतप्रधान मोदी यांनी थोडे थांबायला सांगितले होते. हा प्रतीक्षाकाळ संपला, याचे संकेत शपथविधीनंतर काही मिनिटांतच प्रभू यांनी केलेल्या टिष्ट्वटवरून मिळाले. १३ लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाºयांनी दिलेला पाठिंबा, प्रेम व आत्मीयता या बद्दल आभार मानून प्रभूंनी या टिष्ट्वटमध्ये त्यांचे आभार मानले. त्यानंतर, पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे खाते दिल्याचे जाहीर झाल्यावर प्रभू यांनी दिसरे टिष्ट्वट करून, या जुन्या मित्राचे, सहकाºयाचे रेल्वे मंत्रालयात स्वागत केले व भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाची करण्यासाठी मी त्यांच्या मदतीस नेहमीच तयार आहे, असे नमूद करून, त्यांनी गोयल यांना शुभेच्छा दिल्या.
नवे चेहरे का?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शिवप्रताप शुक्ला हे कट्टर प्रतिस्पर्धी. भाजपाच्या अंतर्गत राजकारणात दीर्घकाळापासून शुक्ला काहीसे मागे पडले होते. राज्यमंत्रिपद देऊन मोदींनी एकप्रकारे त्यांचा जीर्णोध्दारच केला आहे.
संजय बलियान या उत्तर प्रदेशातील जाट राज्यमंत्र्यांच्या जागी सत्यपालसिंग यांना यंदा संधी मिळाली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थानात पुढल्या
वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. वीरेंद्रसिंग हे मध्य प्रदेशच्या टीकमगढहून सहाव्यांदा तर कर्नाटकच्या उत्तर कन्नड मतदारसंघातून अनंतकुमार हेगडे पाचव्यांदा निवडून आले आहेत.
राजस्थान भाजपामध्ये जोधपूरचे गजेंद्रसिंग शेखावत हे प्रभावशाली नेते मानले जातात. माजी राजदूत हरदीपसिंग सुरी दिल्लीचे रहिवासी आहेत.
चार निवृत्त नोकरशहा-
नव्या राज्यमंत्र्यामधे ज्या ४ निवृत्त नोकरशहांचा समावेश आहे, त्यात हरदिपसिंग पुरी १९७४ च्या बॅचचे आयएफएस व संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांचे माजी राजदूत आहेत. सत्यपालसिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते. अल्फोन्स कन्नाथनम १९७९ बॅचचे आयएएस अधिकारी तर आर.के.सिंग हे पूर्वी गृह व संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव होते. या सर्वांच्या अनुभवाचा व कार्यशैलीचा सरकारला लाभ व्हावा, हा त्यांच्या समावेशाचा हेतू
आहे. यापैकी अल्फोन्स व पुरी हे दोघे सध्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.