2025 पर्यंत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कार होतील इतिहासजमा
By admin | Published: May 22, 2017 01:51 PM2017-05-22T13:51:11+5:302017-05-22T14:27:28+5:30
येत्या आठ वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार इतिहासजमा होण्याची शक्यता आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - पेट्रोल-डिझेलसारखे पारंपरिक उर्जेचे स्रोत हळूहळू संपुष्टात येत असल्याने पर्यायी उर्जेच्या स्रोतांचा शोध सुरू झाला आहे. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे अद्ययावत इलेक्ट्रिक कार निर्मिती शक्य होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या आठ वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात पेट्रोल पंप आणि पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवू लागेल, त्यामुळे ग्राहक आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवतील.
स्टॅनफोर्डचे इकॉनॉमिस्ट टोनी सीबा म्हणतात, जागतिक तेल कंपन्यांचा व्यापार 2030 पर्यंत शेवटच्या घटका मोजू लागेल. इलेक्ट्रिक कारचे यूग वाहतुकीला पूर्णपणे बदलून टाकेल, असेही टोनी यांनी आपल्या लेखात म्हटले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रसिद्ध झालेल्या या अध्ययन अहवालात पुढील 8 वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील कार बंद होतील आणि नाइलाजास्तव लोक इलेक्ट्रिक कार आणि अॅटॉनॉमस व्हेईकल्सकडे वळतील, असेही नमूद करण्यात आले होते.
इलेक्ट्रिक वाहनांवर येणाऱ्या खर्चामुळे पुढील काळात कार, बस आणि ट्रक यांची संख्या वेगाने कमी होईल. त्यामुळे पेट्रोलियम बाजारही कोलमडून पडेल, असेही टोनी म्हणतात. Rethinking Transportation 2020-2030" या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात इलेक्ट्रिक आणि अॅटॉनॉमस वाहनांवर येणारा खर्च हा पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा तब्बल दहा पटीने कमी असेल.
इलेक्ट्रिक वाहनांचे आयुर्मान 16 लाख 09 हजार 344 किमी तर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे आयुर्मान केवळ 3 लाख 21 हजार किमी असते. त्यामुळे येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल.