प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येची सीबीआय चौकशी करा - कुटुंबीयांची मागणी; हंगामी प्राचार्य निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:47 PM2017-09-09T23:47:44+5:302017-09-09T23:48:05+5:30
येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणा-या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
गुरूगाव : येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणा-या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. ही शाळा ताबडतोब बंद करावी, अशी मागणी सर्व पालकांनीच केली आहे, तर हंगामी प्राचार्यांना निलंबित करण्यात आले असून, शाळेची सुरक्षा व्यवस्था बदलण्यात आली आहे, असे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. त्या शाळेबाहेर शनिवारीही पालक मोठ्या प्रमाणात जमून घोषणा देत होते.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने हत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दोन अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. या चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा त्या खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. आपल्या मुलाची हत्या बसच्या कंडक्टरने केली, यावर आपला विश्वास नाही. प्रद्युम्न बसने शाळेत जातच नव्हता. त्यामुळे कंडक्टरशी त्याचा कधीही संबंध आला नाही, असे सांगून त्यामुळे कंडक्टर त्याची हत्या का करेल, असा सवाल त्याची आई ज्योती ठाकूर यांनी केला.
शाळेचे व्यवस्थापन काही तरी लपवाछपवी करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. मुलगा टॉयलेटमध्ये पडला, तुम्ही लगेच शाळेत या, असा फोन आला. मी शाळेत गेले, तेव्हा त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. तेथे
व्यवस्थापन व प्राचार्य यांचे नातेवाईकही जमले होते, असे सांगून प्रद्युम्नच्या आईने स्थानिक पोलिसांपेक्षा सीबीआयनेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली.
प्रद्युम्नच्या हत्येमागील खरा गुन्हेगार वेगळा आहे. बस कंडक्टरला अडकवले जाते आहे. प्रद्युम्नने टॉयलेटमध्ये शाळेतील काही जणांना चुकीच्या गोष्टी करताना पाहिले असावे. ती बाब दाबण्यासाठी त्याची हत्या केली असावी, अशी शंकाही आईने व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
राष्ट्रीय महामार्ग काही काळ ठप्प
पालकांनी आजही सकाळपासून शाळेसमोर निदर्शने केली. त्यात स्थानिक रहिवासीही सहभागी झाले होते. त्यामुळे शाळेच्या जवळील राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद झाला. तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. शाळा प्रशासनाविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी पालक करीत आहेत. प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात कारवाईची मागणी केली. ते त्यांच्या वकिलांसह आज पोलीस आयुक्तांना भेटले आणि त्यांनी शाळेवर कडक कारवाईची मागणी केली.