ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मोटार वाहन कायदा 2016च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीला आधारनं जोडण्यात येणार आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचा भंग झाल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे.
आम्ही मोटार वाहन कायदा 2016मधील सुधारणा विधेयक मंजूर केलं आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी आता लोकांना आधारचा नंबर द्यावा लागणार आहे. तसेच लर्निंग लायसन्ससाठी लोकांना परिवहन कार्यालयात जावे लागणार नाही. आता ऑनलाइन पद्धतीनं लर्निंग लायसन्स उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
त्याप्रमाणेच आधारच्या सहाय्यानं तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनं लर्निंग लायसन्स मिळणार असून, बनावट लायसन्स तयार करता येणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. बनावट परवान्यांचा वाढलेला सुळसुळाट आणि चोरीच्या वाहनांची नोंदणी रोखण्यासाठी मोटार वाहन कायदा 2016च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.
काय आहेत तरतुदी?
वाहतूक नियम मोडणा-यांना यापुढे कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हलगर्जीपणाने गाडी चालवल्याने बालकाचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपयांपर्यत दंड आणि किमान सात वर्षाच्या कारावासाची तरतूद नव्या मोटार विधेयकात आहे. विविध प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाईल.
वाहनाची बांधणी सदोष आढळून आल्यास प्रत्येक वाहनानुसार 5 लाख रुपये दंड तसेच हलगर्जीने किंवा बेदरकारपणे वाहन चालवल्याचे आढळून आल्यास परवाना रद्द करण्यासारख्या कडक उपाययोजना आहेत. वाहन असुरक्षितरीत्या वापरल्याचे आढळून आल्यास एक लाख रुपयांचा दंड, सहा महिन्यांच्या कारावासाची तरतूद असून कारावास एक वर्षापर्यत वाढवता येऊ शकतो किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
स्कूल बस चालकांसाठी कठोर नियम स्कूलबसचा चालक दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास 5 हजार रुपये दंड ,तीन वर्षाचा कारावास तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील चालक असेल तर परवाना तडकाफडकी रद्द करण्याची तरतूद आहे. काही परिस्थितीत बालकाचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये दंड, किमान सात वर्षे कारावासाची शिक्षा असेल. तीन वेळा सिग्नल तोडल्यास 15 हजार रुपये दंड, महिन्यासाठी परवाना रद्द तसेच प्रशिक्षण पार पाडण्याचे बंधन असेल.
रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढवल्यास सकल राष्ट्रीय उत्पन्नात 4 टक्के सुधारणा होईल, असे सरकारला वाटते. या क्षेत्रात गुंतवणूक वाढल्यास 1 लाखांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल. देशभरात वर्षभरात 5 लाखांवर अपघात होत असून किमान 1.4 लाख लोक मृत्युमुखी पडतात.
दारू पिऊन वाहन चालविणा-याला 25 हजार रुपये दंड तसेच तीन महिन्यांचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याशिवाय 6 महिने परवाना निलंबित राहील. तीन वर्षांत दुसरा गुन्हा केल्यास 5 हजार रुपये दंड किंवा एक वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा ठोठावली जाईल. परवाना वर्षभरासाठी निलंबित राहील. त्यानंतर लगेच गुन्हा केल्यास परवाना रद्दच केला जाईल. वाहनही एक महिन्यासाठी जप्त केले जाईल.
Web Title: Center approves motor vehicle law reform amendment bill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.