चंद्राबाबू नायडू यांना एनडीएची दारे बंद : शहा, यू-टर्न करणारे संधिसाधू मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:34 AM2019-02-05T06:34:39+5:302019-02-05T06:34:51+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) कदापि घेणार नाही
विजयनगरम : आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) कदापि घेणार नाही, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले.
आंध्र प्रदेशच्या विजयनगरमच्या भाजपा बुथ कार्यकर्त्यांशी त्यांनी सोमवारी संवाद साधला. शहा म्हणाले, नायडू हे यू-टर्न करणारे अन् संधीसाधू मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू केली. काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यांनी एन. टी. रामाराव यांच्या टीडीपी पक्षात प्रवेश केला. तिथे संधी मिळताच रामाराव यांच्या पाठीत खंजीर खुपसून नायडू यांनी टीडीपीवर कब्जा मिळवला. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर नायडू एनडीएमध्ये आले. २००४ साली सरकार सत्तेवरून गेल्यानंतर लगेचच त्यांनी एनडीएला रामराम केला. त्यानंतर १० वर्षे ते कोणत्याच आघाडीत सामील झाले नाहीत. मात्र २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गेल्याशिवाय सत्ता मिळणार नाही हे त्यांनी अचूक ओळखले व ते पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले.
शहा म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नायडू हे एनडीएतून बाहेर पडले व त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यांनी तेलुगू जनतेचा घोर अवमान केला आहे.