छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 09:11 AM2019-03-26T09:11:34+5:302019-03-26T09:50:03+5:30
सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
रायपूर - सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (26 मार्च) चकमक झाली आहे. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गोळीबार थांबल्यानंतरही जवानांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं आहे.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात याआधी काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पाच जवान जखमी झाले असून एका जवानाला हौतात्म्य पत्करावे लागले होते. सीआरपीएफ जवानांची एक तुकडी पोलिसांसोबत आरनपूर क्षेत्रात तैनात होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट घडवण्यात आला होता. स्फोटानंतर लगेचच पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला होता. या चकमकीत 'सीआरपीएफ'चे सहा जवान जखमी झाले होते. मात्र, त्यानंतर एक जवान हुतात्मा झाला. सुरक्षा दलांकडून हा हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते.
Chhattisgarh: Security forces recover bodies of four Naxals, one INSAS rifle and two 303 rifle, during an encounter with naxals in Bimapuram, Sukma; Operation underway
— ANI (@ANI) March 26, 2019
Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा
झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. या नक्षलवादी संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई राबवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी पीएलएफआयच्या नक्षलवाद्याला कंठस्नान घातले होते.
रांचीचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) ए.बी.होमकर यांनी कारवाईबाबत माहिती दिली होती. होमकर म्हणाले की, रनिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये गुरूवारी पहाटेच्या सुमारास चमकम उडाली होती. नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. दरम्यान, जवानांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा ताब्यात घेतला होता.