नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 07:25 PM2024-05-13T19:25:22+5:302024-05-13T19:25:56+5:30
Lok Sabha Election 2024: काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते.
मागच्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरू असलेल्या कारवायांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य करत असतात. त्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. नेहरूंनी केलेल्या चुकांसाठी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदार धरतेय, अशी टीका जयशंकर यांनी केली आहे.
जयशंकर चीनबाबतच्या धोरणाबाबत म्हणाले की, चीनबाबत नरेंद्र मोदी यांची भूमिका ही स्पष्ट राहिलेली आहे. सत्तेत आल्यापासून भाजपा सरकारने एलएसीजवळच्या भागात वेगाने बांधकाम सुरू केलं आहे. आतापर्यंत अनेक रस्ते आणि बोगद्यांचं काम झालं आहे. असं असतानाही काँग्रेकडून चीन भारताच्या जमिनीवर कब्जा करतेय, असा आरोप केला जातोय. काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते. लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या आक्रमणाबाबत जयशंकर म्हणाले की, चीनने १९५८ आणि १९६२ मध्ये भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता.
यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही जयशंकर यांनी टीका केली. आपल्याच सुरक्षा दलांवर टीका करणे दु:खद बाब आहे. जेव्हा तुम्ही चीनने जमीन घेतली म्हणता तेव्हा ती १९६२ मध्येच गेली, हे समजून घेतलं पाहिजे. सध्या देशाची दिशाभूल केली जात आहे. सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अधिकच तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिकाधिक सैनिक तैनात केलेल आहे, असे जयशंकर म्हणाले.
चीनकडून सीमारेषेवर गाव वसवले जात असल्याच्या प्रश्नालाही जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. काही लोक म्हणतात की, चिनी लोक सीमेवर गाव वसवत आहेत. मात्र हे बांधकाम लोंगजू येथे होत आहे. त्यावर चीनने १९५९ मध्ये हल्ला करून कब्जा केला होता. मात्र तुम्ही गुगल मॅपवर ते गावा पाहा आणि त्याबाबत १९५९ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी केलेलं भाषण समजून घ्या. राहुल गांधी लडाखमधील पँगाँग सरोवरात चीनने पूल बांधल्याचे सांगत आहेत. मात्र ते पूल त्या जागी बांधण्यात आलं आहे जिथे १९५८ मध्ये चिनी आले होते. तसेच त्यांनी १९६२ मध्ये त्यावर कब्जा केला होता.