काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिवाळीनंतर राहुल गांधींकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:45 AM2017-10-02T02:45:48+5:302017-10-02T02:46:39+5:30
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते.
नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते.
‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पायलट म्हणाले की, राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी, अशी पक्षात सर्वसाधारण भावना आधीपासूनच आहे. पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ते बरेच कामही करत आहेत, पण त्यांची पक्षाध्यक्षपदी बढती यथोचित वेळी व्हावी, असे पक्षाचे मत आहे. आता ती वेळ आली आहे, असे मला वाटते. पक्षात संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. त्या झाल्या की, नवा अध्यक्ष दिवाळीनंतर लगेचच सूत्रे स्वीकारेल, असे वाटते.
प्रियंका गांधी यांनीही पक्षात पद स्वीकारून सक्रिय राजकारणात यावे का, असे विचारता पायलट म्हणाल्या, प्रियंका काँग्रेसमध्ये आहेतच.
सक्रिय राजकारणात उतरायचे का व केव्हा? याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. घराणेशाहीचे राजकारण आणि काँग्रेसवर घराणेशाहीचा केला जाणारा आरोप याविषयी ते म्हणाले की, राजकारणात नेत्याचे आडनाव ही अपात्रता ठरू नये. एखाद्या घराण्यातील असण्याचा एका मर्यादेपर्यंत फायदा होऊ शकतो, परंतु शेवटी तुम्ही काम काय व किती करता, लोकांची मने कशी जिंकता, यावरच तुमचे यश अवलंबून आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाºया भाजपामध्येही अनेक नेतेही घराणेशाहीनेच आलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अमेथी दौºयावरून वाद; तारखा बदलण्याच्या सूचना
लखनऊ : राहुल गांधी यांनी येत्या
४ ते ६ आॅक्टोबर असा अमेथी या आपल्या मतदारसंघाचा दौरा योजला आहे, परंतु त्या वेळी पोलीस व प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात व्यग्र राहणार असल्याचे गांधी यांच्या दौºयाच्या तारखा बदलाव्या, असे पत्र जिल्हा प्रशासनाने पक्षाला लिहिले आहे. काँग्रेसने यावर टीका केली. राहुल गांधी
येऊन अडचणीचे मुद्दे सांडतील, म्हणून योगी आदित्यनाथ सरकार त्यांचा दौरा होऊ नये, असा पाहात आहे. जमल्यास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या १० आॅक्टोबरच्या दौºयानंतर राहुल आले तर बरे, असा सरकारचा प्रयत्न दिसतो, असा आरोप पक्षाने केला.
सचिन पायलट म्हणाले की, ज्येष्ठांना अडगळीत टाकून, त्यांची मानखंडना करण्याची काँग्रेसची परंपरा नाही. भाजपाचे ‘मार्गदर्शक मंडळ’ ही सर्वात मोठी विडंबना आहे. पक्षात वयाची ठरावीक मर्यादा असू नये. प्रश्न पक्ष नव्या पिढीकडे सोपविण्याचा नाही. ज्येष्ठ व तरुण यांनी एकत्र येऊन काम करणे, नक्कीच गरजेचे आहे.