Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:02 PM2024-05-13T13:02:34+5:302024-05-13T13:11:47+5:30
Lok Sabha Election 2024 And Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रायबरेलीला पोहोचले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आता रायबरेलीला पोहोचले आहेत. याच दरम्यान एका जाहीर सभेत काँग्रेसच्या उमेदवाराने आश्वासन दिलं की, जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर जुलै महिन्यापासून महिलांच्या बँक खात्यात 8500 रुपये जमा केले जातील. जर सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे ट्रान्सफर होतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, "सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर लोकांची यादी तयार केली जाईल. येथे असलेले हजारो लोकही यात सामील होतील आणि जुलैपासून त्यांच्या खात्यात खटा-खट, खटा-खट पैसे जमा होतील. तुम्ही कल्पना करू शकता की, 1 जुलै रोजी गरीब लोक त्यांच्या बँक खात्यात 8,500 रुपये पाहतील आणि त्यानंतर खटा-खट, खटा-खट पैसे मिळतील."
"काही दिवसांपूर्वी मी आईसोबत (सोनिया गांधी) बसलो होतो... मी आईला सांगितलं की एक-दोन वर्षांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माझ्या दोन माता आहेत, एक सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी... माझ्या दोन्ही माता, ही कर्मभूमी आहे, म्हणूनच मी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."
राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या असून येत्या काळात आपल्या राजकारणात, धोरणात बदल करावे लागणार असल्याचं म्हटलं य़ाआधी म्हटलं होतं. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये झालेल्या 'राष्ट्रीय संविधान परिषदेत' राहुल गांधी म्हणाले की, "सत्य हे आहे की काँग्रेस पक्षाला आगामी काळात आपलं राजकारण बदलावं लागेल. काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे."