भारत-पाकिस्तान अणवस्त्र युद्धाची किंमत जगाला चुकवावी लागेल
By admin | Published: September 29, 2016 07:39 PM2016-09-29T19:39:18+5:302016-09-29T19:50:37+5:30
भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल. भारताने गुरुवारी पाकव्याप्त काश्मिरमधील लष्करी तळांवर हल्ले करुन उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा अणवस्त्र युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काय परिणाम होतील याचा घेतलेला आढावा.
- भारत-पाकिस्तान दोन्ही देशांनी त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांपैकी निम्म्या १०० अणवस्त्रांचा जरी परस्परांविरुद्ध वापर केला तर एकाचवेळी दोन्ही देशांतील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल.
- अणवस्त्र वापरल्यामुळे पृथ्वीचे रक्षण करणारा निम्मा ओझोनचा थर नष्ट होईल.
- दोन्ही देशांकडे असलेला प्रत्येक अणूबॉम्ब जवळपास १५ किलो टन वजनाचा आहे. अमेरिकेने हिरोशिमावर १५ किलो टन वजनाचा अणूबॉम्ब टाकला होता. दोन्ही देशातील अणवस्त्र युद्धामुळे मान्सूनच्या पावसामध्ये बदल होऊन जगभरातील कृषी क्षेत्रावर परिणाम होईल.
- अणवस्त्र हल्ल्यानंतर पहिल्या आठवडयातच भाजल्यामुळे, किरणोत्सारामुळे दोन्ही देशातील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल.
- मागच्या नऊ वर्षात दहशतवादी हल्ल्यात जितके भारतीय नागरीक आणि सुरक्षा जवान मारले गेले त्यापेक्षा २२२१ पट नागरीक एकाचवेळी मारले जातील.
- उपखंडात झालेल्या अणवस्त्र वापरानंतर वातावरणातील बदलांमुळे जगभरातील दोन अब्ज लोकांना उपासमार आणि अन्य परिणाम भोगावे लागतील.
- पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला ११० ते १३० च्या आसपास अणवस्त्रे आहेत. भारताकडे असलेल्या अणवस्त्रांची संख्याही ११० ते १२० च्या घरात आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाल्यास त्याचे काय परिणाम होतील यासंबंधी २००७ साली अमेरिकेतील तीन विद्यापीठांनी संशोधन करुन हे निष्कर्ष नोंदवले आहेत.