निष्काळजीपणाचा कळस: आता फरुखाबादमध्ये ४९ बालकांचा मृत्यू, आॅक्सिजनचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:16 AM2017-09-05T01:16:30+5:302017-09-05T01:16:50+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमधील बाबा राघवदास इस्पितळातील १३00 बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच,
फरुखाबाद (उ. प्र.) : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमधील बाबा राघवदास इस्पितळातील १३00 बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच, उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्हा रुग्णालयातही गेल्या महिनाभरात आॅक्सिजनच्या अभावी ४९ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीका सुरू झाली असून, भाजपाचे नेतेही अस्वस्थ झाले आहेत.
फरुखाबादमधील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात हा प्रकार घडल्याचे रविवारी उघडीस आले. ही बालके २१ जुलै ते २0 आॅगस्ट या काळात मरण पावली. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या संबंधीच्या बातम्या प्रसारित केल्यानंतर, मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल
घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांना चौकशी करण्याचे निर्देश
दिले. रवींद्र कुमार व नगर दंडाधिकारी जयेंद्र कुमार जैन यांनी चौकशी करून, सर्व बालकांचे मृत्यू आॅक्सिजनच्या अभावी आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.
त्यांच्या अहवालानंतर जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व मुख्य वैद्यकीय अधीक्षकांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. रुग्णालयाच्या प्रशासनाने मात्र, बालकांचा मृत्यू आॅक्सिजनअभावी व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा इन्कार केला आहे. ही सारी बालके कमी वजनाची आणि आजारी होती, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
राज्य सरकारने जिल्हाधिकारी, तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी व मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत.
गोरखपूर येथील प्रकरण उघड झाल्यानंतर, सुरुवातीस सरकारने आॅक्सिजन तुटवड्याचा इन्कार करून ते मृत्यू अस्वच्छतेमुळे होणाºया मेंदूज्वराने झाल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर मृत्यूंची संख्या वाढत जाऊन ती काही शेच्या घरात गेल्यावर, सरकारने निष्काळजीपणाची कबुली देत इस्पितळाच्या डॉक्टरांना अटक केली. (वृत्तसंस्था)
काँग्रेसची टीका-
योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘रोगी प्रदेश’झाला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आधी गोरखपूरच्या बाबा राघवदास इस्पितळात चार दिवसांत ७0 बालके मरण पावली. नंतर महिनाभरात मरणाºया बालकांची संख्या १३00 वर गेल्याचे उघडकीस आले. आता फरुखाबादमध्ये एका महिन्यात ४९ बालके मरण पावली आहे. यावरून योगी आदित्यनाथ सरकार कसे निष्काळजी आहे, हेच समोर येते, अशी टीका काँग्रेसने केली.