सांस्कृतिक रोड शो ते गुजराती थाली : जपानचे पंतप्रधान शिंजो अबेच्या भारत दौ-याबद्दल जाणून घ्या 'या' 10 गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:39 IST2017-09-13T12:39:24+5:302017-09-13T12:39:24+5:30
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. त्यांच्या या भेटीत गुजरातमध्ये गुंतवणूकीचे 15 करार होणार आहेत.

सांस्कृतिक रोड शो ते गुजराती थाली : जपानचे पंतप्रधान शिंजो अबेच्या भारत दौ-याबद्दल जाणून घ्या 'या' 10 गोष्टी
अहमदाबाद, दि. 13 - जपानचे पंतप्रधान शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. त्यांच्या या भेटीत गुजरातमध्ये गुंतवणूकीचे 15 करार होणार आहेत.
- भारत दौ-यावर येणारे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये रोड शो होणार आहे. विमानतळ ते टॅक्स ऑफीस या आठ किलोमीटरच्या मार्गावरील रोड शो मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.
- आठ किलोमीटरच्या रोड शो च्या संपूर्ण मार्गामध्ये साबरमती रिव्हरफ्रंटचाही समावेश असून, एकूण 28 छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. जिथे 28 राज्यातील कलाकार आपल्या पारंपारिक वेशभूषेत नृत्यकला सादर करतील.
- अबे साबरमती गांधी आश्रमात जातील तेव्हा मोदी स्वत: त्यांच्यासोबत असतील. 1917 ते 1930 या काळात महात्मा गांधींनी साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते.
- मोदी आणि शिंजो अबे 16 व्या शतकातील सिदी सय्यद मशिदीला भेट देतील. विशिष्ट प्रकारच्या दगडी बांधकामामुळे ही मशिद लक्ष वेधून घेते. यावेळी दोन्ही नेत्यांसमोर शहरातील पुरातन वास्तूंचे प्रेझेंटेशन केले जाईल.
- त्यानंतर मोदी आणि अबे लाल दरवाजाजवळच्या अग्गासी रेस्टॉरंटमध्ये भोजन घेतील. इथे मिळणारी गुजराती थाली या रेस्टॉरंटची ओळख आहे.
- उद्या गुरुवारी दोन्ही नेते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी करतील. अहमदाबाद-मुंबई मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे.
- दहा डब्ब्यांच्या या बुलेट ट्रेनमध्ये 750 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल. या ट्रेनमुळे दोन शहरांमधला सात तासांचा प्रवास तीन तासावर येणार आहे.
- पुढे या ट्रेनला 16 डब्बे असतील. त्यामधून एकाचवेळी 1200 जणांना प्रवास करता येईल.
- बुलेट ट्रेनच्या या एकूण प्रकल्पासाठी 1.10 लाख कोटींचा खर्च येणार आहे. त्यातील 88 हजार कोटी रुपये जपान कर्ज म्हणून देणार आहे.
- 2022 पर्यत हा प्रकल्प पूर्ण करायचा उद्देश आहे. त्याचवर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.