पुरुष फुटबॉल खेळाचे सामने मुस्लिम महिलांनी पाहणं हराम, देवबंदचा नवा फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 05:37 PM2018-01-30T17:37:29+5:302018-01-30T17:44:07+5:30
उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदनं एक नवा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे.
लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदनं एक नवा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहू नये. देवबंदचे मुफ्ती अतहर कासमी म्हणाले, उघड्या गुडघ्यांनी फुटबॉल खेळणा-या पुरुषांना पाहणं हे इस्लामच्या नियमांच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांसाठी हे हराम आहे. दारुल उलूम देवबंदच्या मुफ्तींनी महिलांना टीव्हीवर फुटबॉलचे सामने पाहण्यास परवानगी देणा-या नव-यांनाही फटकारलं आहे.
देवबंदचे मुफ्ती म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही काय ?, तुम्ही अल्लाहाला घाबरत नाही काय ?, पत्नीला अशा प्रकारचे फुटबॉलचे सामने का पाहायला देता, असा सवालही देवबंदच्या मुफ्तींनी उपस्थित केला आहे. सौदी अरेबियात गेल्या महिन्यात महिलांना स्टेडियममध्ये फुटबॉल सामने पाहण्यास परवानगी दिली आहे. सौदी अरेबियात सुन्नी मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. मुफ्तींनी फतव्याचं समर्थन करत महिलांना फुटबॉलचे सामने पाहण्याची काय गरज आहे.
फुटबॉलमधील खेळाडूंच्या उघड्या मांड्या पाहून त्यांना कोणता लाभ होणार आहे. फुटबॉल सामने पाहताना महिलांचं लक्ष त्यांच्या उघड्या मांड्यांवरच असतं. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर जिल्ह्यातील दारुल उलूम देवबंद हे 150 वर्षं जुनं इस्लामिक संस्थान आहे. या युनिव्हर्सिटीत मुस्लिम धर्माशी निगडीत सुन्नी हनफी धर्मशास्त्राशी संबंधित शिक्षणही दिलं जातं. परंतु लखनऊच्या एका मुस्लिम महिला अधिकार कार्यकर्त्या साहिरा नसीह या फतव्याची कडक शब्दांत निंदा केली आहे.