दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस, भाजपा नेत्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 08:07 AM2017-11-20T08:07:34+5:302017-11-20T08:10:45+5:30
हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे
नवी दिल्ली - पद्मावती चित्रपटावरुन सुरु झालेला वाद अद्यापही सुरु असून हरियाणामधील भाजपा पदाधिका-याने केलेल्या वक्तव्यामुळे वादात अजून भर पडली आहे. राज्यातील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली आहे.
नुकतंच काही दिवसांपुर्वी मेरठमधील एका व्यक्तीने दीपिका आणि भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला पाच कोटीच्या बक्षिसाची घोषणा केली होती. यावर बोलताना सूरजपाल बोलले आहेत की, 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार'.
दीपिका आणि भन्साळी यांचं शीर कापणा-याला आपल्याच समाजातील लोकांकडून 10 कोटी गोळा करुन देण्यात येतील असं सूरजपाल अम्मू बोलले आहेत. इतकंच नाही तर, जो कोणी संजय लिला भन्साळी यांचं शीर कापेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेऊ अशीही घोषणा त्यांनी केली आहे. रणवीर सिंह याने एका मुलाखतीत आपला भन्साळींना पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. यावर बोलताना त्यांनी रणवीर सिंगला धमकी देत, आपले शब्द मागे घेतले नाहीत तर त्याचे हात पाय तोडण्यात येतील अशी धमकीच देऊन टाकली.
Agar tune apne shabd wapas nahin liye to teri taango ko todke tere haath mein de denge: Suraj Pal Amu, Haryana's BJP Chief Media Coordinator on Ranveer Singh #Padmavatipic.twitter.com/mMON1Kk38x
— ANI (@ANI) November 19, 2017
चित्रपटाच्या फंडिंगवरही सूरजपाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'संजय लिला भन्साळी तीन कोटींच्या लायकीचे नाहीत, पण त्यांना 300 कोटी मिळाले आहेत'. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना याविषयी बोलण्याचं आवाहनही केलं.
#WATCH:Haryana BJP Chief Media Coordinator SP Amu says will quit BJP if needed,asks PM to exercise his powers to strike down film #Padmavatipic.twitter.com/h2x76mdAKb
— ANI (@ANI) November 19, 2017
'वसुंधरा राजे म्हणतात की चित्रपटातून काही गोष्टी काढून टाकणं गरजेचं आहे. विसरुन जावा, आम्ही हा चित्रपट चालूच देणार नाही', असं सूरजपाल अमू बोलले आहेत.
‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले
चित्रपटगृहांत झळकण्यापूर्वीच वादाचा विषय ठरलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे.
निर्मात्यांनी प्रदर्शनासाठी केलेला अर्ज ‘अपूर्ण’ आहे असे कारण देत चित्रपट सेन्सॉर बोर्डानेही अद्याप या चित्रपटाला जाहीर प्रदर्शनाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. ‘व्हायकॉम १८’च्या प्रवक्त्याने रविवारी एका निवेदनात म्हटले की, आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत व या देशातील कायदे व सेन्सॉर बोर्डासह सर्व वैधानिक संस्थांविषयी आम्हाला आदर आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा मुंबईत माध्यम प्रतिनिधींसाठी खासगी शो आयोजित केला होता. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्याच संदर्भात बोर्डाचे एक सदस्य अर्जुन गुप्ता यांनी भन्साळी प्रसिद्धीसाठी मुद्दाम वाद निर्माण करीत असल्याचा आरोप केला.