ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 06:22 PM2024-05-10T18:22:55+5:302024-05-10T18:25:00+5:30

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे राऊज एवेन्यू कोर्टाने म्हटले आहे.

Delhi court orders framing of charges against ex-WFI chief Brij Bhushan Singh in sexual harassment case | ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 

ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषणप्रकरणी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. राऊज एवेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सचिव विनोद तोमर यांच्याविरोधात सुद्धा आरोप निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे राऊज एवेन्यू कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे), ३५४-अ (लैंगिक छळ) आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. तर विनोद तोमर यांच्यावर कलम ५०६(१) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध १५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी कलम ३५४, कलम ३५४-अ आणि कलम  ५०६ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. तसेच, या प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह ३० हून अधिक कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते.

यापूर्वी तक्रारदारांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाला कळवले की, एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. तसेच, २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला होता.

Web Title: Delhi court orders framing of charges against ex-WFI chief Brij Bhushan Singh in sexual harassment case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.