देवदासी महिला बनली सीईओ
By admin | Published: May 6, 2016 10:49 PM2016-05-06T22:49:27+5:302016-05-06T22:53:17+5:30
देवाला सोडलेली देवदासी महिला आता चक्क एका संस्थेची सीईओ
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6- सातव्या शतकात दक्षिण भारतात भक्तीची परंपरा खूप प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी देवाला वाहून घेतलेली माणसं एका तीर्थक्षेत्रावरून दुस-या ठिकाणी जाऊन पैशासाठी भजन आणि कीर्तन करत असत. त्याकाळी गाणं हे देवाच्या प्रार्थनेसाठी महत्त्वाचं समजलं जायचं. देवाला देवदासी सोडण्याची प्रथा होती. अशीच एक देवाला सोडलेली देवदासी महिला आता चक्क एका संस्थेची सीईओ झाली.
सीताव्वा जोडत्ती नावाची महिला नऊ बहिणींमधली एक होती. तिला कोणीही भाऊ नव्हता. तिच्या तीन बहिणी तरुणपणातच गेल्या. त्यामुळे एका मुलीनं तरी यल्लम्मा देवीची पूजा करावी, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर सीताव्वा देवदासी झाली. कालांतरानं सीताव्वाच्या वडिलांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम करण्याचं सोडून दिलं. त्यामुळे सीताव्वा वडिलांसोबत राहू लागली आणि ती कुटुंबाला आर्थिक मदत करू लागली. कालांतरानं जोडत्तीच्या संपत्तीची ती एकमेव मालकीण झाली.
त्याच वेळी कर्नाटक सरकारनं 1987ला कायदा करून देवदासी प्रथा बंद केली. 1990ला सर्व देवदासींनी मिळून सेल्फ हेल्प ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तिनं सामाजिक कार्याल सुरुवात केली. कर्नाटक स्टेट वुमन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(केएसडब्लूडीसी)मधून तिनं निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर ती महिला अभिवृद्धी मट्टू समरक्षण समस्थे अर्थात मास या संस्थेत दाखल झाली आणि त्या संस्थेनं अखेर तिला सीईओ बनवलं.