मोदींनी भोपाळमधून लढवावी निवडणूक; दिग्विजय सिंह यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:11 AM2019-03-26T11:11:28+5:302019-03-26T13:49:21+5:30
माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भाजप मध्य प्रदेशातील २९ पैकी सर्वच्या सर्व २९ जागा जिंकेल. राज्यात भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही.
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा निवडणुकीत भाजपचा गड असलेल्या भोपाळचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. १९८९ पासून या मतदार संघात भाजपचा एकदाही पराभव झालेला नाही. या मतदार संघातून दिग्विजय यांना माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आव्हान देण्याची शक्यता आहे. परंतु दिग्विजय सिंह यांनी एक पाउल पुढे टाकत, भोपाळमधून आपल्याविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे.
दिग्विजय सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: येऊन माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी. कोणीही असो, शिवराज किंवा प्रज्ञा ठाकून मी तयार आहे. प्रत्येक निवडणूक कठिणच असते, कोणत्याही निवडणुकीला सोपं समजू नये. मी पूर्णपणे सतर्क असल्याचे सांगत दिग्विजय सिंह यांना आपल्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी भोपाळला यावे अशी इच्छा व्यक्त केली.
सर्व जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास
दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भाजप मध्य प्रदेशातील २९ पैकी सर्वच्या सर्व २९ जागा जिंकेल. राज्यात भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही.
दरम्यान दिग्विजय सिंह यांची निवडणूक लढविण्यासाठी पहिली पसंती राजगड मतदार संघाला होती. परंतु, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी भोपाळमधून लढविण्यास होकार दिला. या जागेवर तीन दशकापासून भाजपचे वर्चस्व आहे. सध्या अशोक झांवर या मतदार संघातून खासदार आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये २७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात सत्तांतर झाले असून काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.