सिंगापूरमध्ये धावतेय 'दिवाळी स्पेशल ट्रेन', रेल्वे स्टेशन, बसेसमध्येही दिवाळी थीमवर सजावट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 07:52 PM2017-10-20T19:52:34+5:302017-10-20T19:55:57+5:30
दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर, जगातील अन्य देशातही मोठया उत्साहात साजरा केला जातो.
नवी दिल्ली - दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर, जगातील अन्य देशातही मोठया उत्साहात साजरा केला जातो. ज्या देशात भारतीय वंशाचे नागरिक मोठया संख्येने आहेत त्या देशातही दिवाळी मोठया उत्साहात साजरी केली जाते. अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळी साजरी केल्यानंतर आता सिंगापूरमध्ये दिवाळीच्या थीमवर काही ट्रेन्स चालवण्यात आल्या. त्यामुळे यंदाची दिवाळी सिंगापूरमध्ये राहणा-या भारतीयासांठी खास आहे.
सिंगापूरच्या वाहतूक मंत्रालयाचा भाग असलेल्या लँड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीने दिवाळीच्या थीमवर आधारीत ट्रेन्सची अंतर्गत सजावट केली होती. दिवे, हत्ती, कमळाच्या फुलाची ट्रेनमध्ये सजावट करण्यात आली होती. फक्त ट्रेन्स नव्हे तर, संपूर्ण रेल्वे स्टेशन आणि पाच बसेसची दिवाळीच्या थीमवर सजावट करण्यात आली होती. सिंगापूरचे परिवहन मंत्री खा बून वान यांनी रविवारी या ट्रेन्सचे उदघाटन करुन त्यामधून प्रवास केला.
सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे नागरिक मोठया संख्येने वास्तव्याला आहेत. प्रकाशाचा उत्सव दिवाळीची आम्ही सुरुवात करत आहोत. लोकांना ट्रेन, स्टेशन्सवर भारतामध्ये असल्याचा फिल येईल असे लँड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीने सांगितले.