शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी करू नका

By admin | Published: February 25, 2016 04:44 AM2016-02-25T04:44:25+5:302016-02-25T04:44:25+5:30

शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी बनवू नका, अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करते. मृत रोहित वेमुलाचे राजकीय शस्त्र बनवून केंद्र सरकारवर हल्ला करणे योग्य नाही. मी कोणत्याही विद्यापीठाच्या कामकाजात

Do not make battlegrounds of education | शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी करू नका

शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी करू नका

Next

जेएनयू-वेमुला प्रकरण : संसदेत स्मृती इराणींचे आक्रमक उत्तर

नवी दिल्ली : शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी बनवू नका, अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करते. मृत रोहित वेमुलाचे राजकीय शस्त्र बनवून केंद्र सरकारवर हल्ला करणे योग्य नाही. मी कोणत्याही विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप केलेला नाही, शिक्षणाचे भगवेकरण केले जात असल्याचा आरोप पूर्ण खोटा आहे, यूपीए सरकारच्या काळात नेमलेल्या एकाही कुलगुरूला हटवलेले नाही. कोणत्याही विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप केलेला नाही. तरीही एकाही कुलगुरूने हस्तक्षेपाची तक्रार केल्यास राजीनामा देईन, अशा शब्दांत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले.
कन्हय्या, उमर खालिद आणि अन्य काही विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्याची शिफारस जेएनयू प्रशासनानेच केली होती, असे सांगत लोकसभेत त्यांनी विरोधी सदस्यांच्या टीकेला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. जेएनयूसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्यापीठ बदनाम करून बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला होता. तो इराणी यांनी फेटाळून लावला. दिल्ली स्टुडंट्स युनियनसारख्या संघटनेच्या नेत्यांबरोबर जेएनयूमध्ये राहुल गांधी बसले होते, याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, राष्ट्रद्रोही घोषणा देणाऱ्यांसमवेत राहुल गांधी का गेले. मात्र काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या प्रत्येक आरोपाला आणि टीकेला स्मृती इराणी यांनी अत्यंत जोमाने उत्तरे दिली.

डोके कापून मायावतींच्या पायावर ठेवण्याचीही तयारी
हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येविषयी झालेल्या चर्चेत बसपाच्या नेत्या मायावती यांनी केलेल्या टीकेमुळे इराणी इतक्या संतप्त व भावूक झाल्या की, मायावती यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी आहे. तरीही त्यांचे समाधान होत नसेल तर माझे डोके कापून त्यांच्या पायावर ठेवण्याचीही तयारी आहे, असेच त्या उद्गारल्या.

आत्महत्येचे राजकीय शस्त्र बनविले
वेमुलाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार नाही, मी जबाबदार नाही, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याने कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही, एवढेच नव्हे, तर आपल्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही, असे त्याने लिहिले होते, असे त्या लोकसभेत म्हणाल्या. त्याचा देह लगेचच रुग्णालयात न्यावा, असे कोणालाही वाटले नाही, कारण त्याच्या आत्महत्येचे राजकीय शस्त्र बनवण्याची विरोधकांची इच्छा होती, असा आरोप करून इराणी म्हणाल्या, स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना ७00 लोक मरण पावले, तेव्हा तेथे एकदाही न फिरकलेले राहुल गांधी केवळ राजकीय फायदा उठवण्यासाठीच दोनदा हैदराबाद विद्यापीठात गेले.

उत्तर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत नाही
स्मृती इराणी यांच्या भाषणाच्या वेळी लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. त्याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, माझे उत्तर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत नाही.
तुमचे हेतूच चांगले नाहीत. जेएनयूमधील घटनांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, उमर खालिदने विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल केली होती. कविता संमेलनाच्या कार्यक्रमासाठी त्याने प्रशासनाची परवानगी मागितली होती.
प्रत्यक्षात तेथे राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या. तेथे कन्हय्या कुमारही हजर होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनानेच
त्या दोघांसह अन्य काहींच्या निलंबनाची शिफारस केली होती.

त्यांच्या भाषणाच्या वेळी विरोधी सदस्य वारंवार अडथळे आणत होते. पण त्यांना न जुमानता त्यांनी आपले म्हणणे पूर्णपणे मांडले. राज्यसभेत त्या संतप्त होऊन उत्तर द्यायला उभ्या राहताच, माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी त्यांना, तुम्ही मंत्री आहात, मंत्र्याप्रमाणेच तुमचे वर्तन असायला हवे, असा इशारेवजा सल्लाच दिला.

वेमुला आत्महत्येच्या चर्चेत इतका गदारोळ झाला की राज्यसभेचे कामकाज सात वेळा तहकूब करावे लागले. तिथे मुख्यत: मायावती आणि स्मृती इराणी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली, तर जेएनयूतील घटनांवर लोकसभेत झालेल्या चर्चेत काँग्रेस व भाजपा सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

विरोधकांच्या आरोपांना चाणक्याच्या शब्दांत मी उत्तर दिले तर माझ्यावर पुन्हा भगवेकरणाचा आरोप होईल. त्यामुळे रोमन विचारवंताच्या शब्दांत सांगते की, शिक्षणक्षेत्रात राजकारण आणू नका, शिक्षणाची युद्धभूमी बनवू नका. - स्मृती इराणी

जेएनयू प्रकरणात निर्दोष विद्यार्थ्यांला त्रास होणार नाही. स्मृती इराणींच्या भाषणामुळे केवळ संसदेचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचेच डोळे उघडतील.- राजनाथ सिंग

Web Title: Do not make battlegrounds of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.