प्रजासत्ताक दिनासाठी आजवर आलेल्या पाहुण्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 02:27 PM2018-01-25T14:27:24+5:302018-01-25T15:45:21+5:30
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून दरवर्षी एका देशाच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधानांना बोलावण्याची पद्धत आपल्याला माहिती आहेच. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी आसिआन देशांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात आहेत. 1950 साली झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकार्णो उपस्थित होते.
मुंबई- भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून दरवर्षी एका देशाच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधानांना बोलावण्याची पद्धत आपल्याला माहिती आहेच. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी आसिआन देशांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात आहेत. 1950 साली झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकार्णो उपस्थित होते. त्यानंतर 2011 साली इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुसिलो बांबाग युधोयोनो उपस्थित होते. त्यानंतर उद्या होणाऱ्या कार्यक्रमात इंडोनेशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो उपस्थित राहाणार आहेत. याचाच अर्थ इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी आजवर या कार्यक्रमास हजेरी लावलेली आहे. प्रमुख पाहुणे होण्याचा मान इंग्लंड आणि फ्रान्सला पाच वेळा, भूतानला चार वेळा तर रशियाला चार वेळा मिळाला आहे. शेजारील देश, आफ्रिकेतील देश, तसेच युरोपातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना ही संधी देण्यात आलेली आहे.
आजवर उपस्थित राहिलेले काही पाहुणे-
१९५० : सुकार्णो (राष्ट्रपती इंडोनेशिया)
१९५१ : राजे त्रिभुवनवीर विक्रम शाह (राजे नेपाळ)
१९५४ : मलिक गुलाम मोहंमद (गव्ह. जन. पाकिस्तान)
१९५५ : मार्शल येजिनयिंग- (चेअरमन स्टँ. कमिटी चीन)
१९६० : क्लिमेंट वोरोशिलोव (चेअरमन रशियन संघराज्य)
१९६१ : राणा अब्दुल हमिद- (कृषिमंत्री पाकिस्तान)
१९७४ : सिरिमाओ बंदारनायके (पंतप्रधान श्रीलंका)
२००६ : किंग अब्दुल्ला बिन अब्दुल्लाह ( राजे सौदी अरेबिया)
२००७ : व्लादिमिर पुतीन- (राष्ट्राध्यक्ष रशिया)
२०१५ : बराक ओबामा- (राष्ट्राध्यक्ष अमेरिका)
२०१६ : फ्रँकोइ ओलांद (राष्ट्राध्यक्ष फ्रान्स)
India extends a warm welcome to the @ASEAN leaders who have arrived to take part in the ASEAN-India Commemorative Summit (AICS) to celebrate 25 years of India-ASEAN partnership and our #RepublicDay celebrations. It is the honour of 125 crore Indians to host these eminent leaders.
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2018
यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी उपस्थित राहणारे पाहुणे-
सुलतान हसनल बोल्काय (अध्यक्ष, ब्रुनेई)
ह्युन सेन (पंतप्रधान, कंबोडिया)
जोको विडोडो (राष्ट्राध्यक्ष, इंडोनेशिया)
थाँगलून सिसूलिथ (पंतप्रधान, लाओस)
नजीब रजाक (पंतप्रधान, मलेशिया)
आंग सान सू की (स्टेट कौन्सीलर, म्यानमार)
रोड्रिगो रोआ ड्युआर्टे (राष्ट्राध्यक्ष, फिलिपाइन्स)
ली ह्यसीन लूंग (पंतप्रधान, सिंगापूर)
प्रायुथ चान ओचा (पंतप्रधान, थायलंड)
न्ग्युएन झुआन फुक (पंतप्रधान, व्हीएटनाम)
राजपथावरील संचलन-
या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन, त्यानंतर राष्ट्रगीत आणि अशोक चक्र व कीर्तीचक्र हे सन्मान देण्याचा प्रमुख कार्यक्रम असतो. त्यानंतर राष्ट्रपती संचलनाची पाहणी करून सलामी स्वीकारतात. हे संचलन राजपथावर पोहोचायला पाच वर्षे लागली. १९५४पर्यंत कधी किंग्ज कॅम्प, कधी लाल किल्ला, तर कधी रामलीला मैदानात ते होत होते. मात्र, वेळ बदलत असे.
पहिला प्रजासत्ताक सोहळा-
२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज
‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून
गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.
बीटिंग द रिट्रिट-
२९ जानेवारी रोजी मावळणाऱ्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या कार्यक्रमाने ‘प्रजासत्ताक दिन सोहळा’ अधिकृतरीत्या संपतो. नॉर्थ आणि साउथ ब्लॉक जवळ होणाऱ्या या कार्यक्रमात विविध बँड्सचा समावेश असतो. या तीन दिवसांमध्ये राष्ट्रपती भवन आणि परिसरास दिव्यांची रोशणाई केली जाते.