आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 03:37 PM2019-04-17T15:37:54+5:302019-04-17T15:39:04+5:30
मात्र व्हीव्हीपॅट मशिनवर जर कोणत्या मतदारांनी संशय उपस्थित केला तर व्हीव्हीपॅट मशिनला मतदार थेट आव्हान देऊ शकतो. त्यासाठी मतदारांना फक्त २ रुपये खर्च करावे लागणार आहे.
नवी दिल्ली - देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून ईव्हीएम मशिनवर राजकीय पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. त्यामुळे मतदारांच्या मनातही ईव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित होते. हाच गोंधळ लक्षात घेता मतदारांना आपण कोणाला मतं दिलं याची खात्री करुन देण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदा ईव्हीएम मशिनसह व्हीव्हीपॅट मशिनही मतदान केंद्रात लावण्यात आली आहे. मात्र व्हीव्हीपॅट मशिनवर जर कोणत्या मतदारांनी संशय उपस्थित केला तर व्हीव्हीपॅट मशिनला मतदार थेट आव्हान देऊ शकतो. त्यासाठी मतदारांना फक्त २ रुपये खर्च करावे लागणार आहे. तसेच जर व्हीव्हीपॅट (VVPAT) ला चुकीचं आव्हान दिलं गेलं तर त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हा नोंद होईल याचीही नोंद मतदारांनी घ्यावी. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाकडून यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हीव्हीपॅट मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीच्यावेळी ईव्हीएमवर घोटाळा केल्याचा आरोप नेहमीच केला जातो. एखाद्या पक्षाला केलेलं मतदान दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मिळतं असा आरोप ईव्हीएम मशिनबाबत केला जातो. मात्र जर आता कोणाला असा संशय आला तर त्यांनी फक्त २ रुपये फी भरुन व्हीव्हीपॅटला आव्हान देऊ शकतात. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून संबंधित पक्षाच्या प्रतिनिधींसमोर VVPAT ट्रॉयल करुन सत्य समोर आणलं जाईल. मात्र या प्रक्रियेनंतर जर तुमचा आरोप खोटा निघाला तर संबंधितांवर प्रशासनाकडून एफआयआर दाखल केली जाणार आहे.
ईव्हीएमवर संशय घेतल्यामुळे निवडणूक आयोगाची शक्कल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ मध्ये अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला त्यामुळे ईव्हीएमवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर देशात अनेक निवडणुकांमध्ये ईव्हीएमवर संशय घेण्यात येऊ लागला. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून यंदा एम-३ मशिन बनविण्यात आली आहे. त्याद्वारे तुम्ही ईव्हीएममध्ये कोणाला मतदान केलं याची शंका असेल तर त्याला तुम्ही आव्हान देऊ शकता अशी व्यवस्था निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.
या गुन्ह्याखाली होणार तक्रार दाखल
व्हीव्हीपॅटला आव्हान दिल्यानंतर जर तुमचा आरोप खोटा निघाला तर प्रशासनाकडून तुमच्यावर एफआयआर दाखल होऊ शकते. आयपीसी १७७ कलमांतर्गत तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. या कलमानुसार तुम्हाला सहा महिने कारावास त्याचसोबत १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम २६ अंतर्गतही गुन्हा नोंद होऊ शकतो.
राज्यभरात निवडणूक आयोगाकडून व्हीव्हीपॅट तंत्रज्ञानाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. मतदानाच्यावेळी ईव्हीएम मशिनसह व्हीव्हीपॅट मशिन युनिटही ठेवण्यात येतं. त्यामुळे तुम्ही एखाद्या उमेदवाराला मतदान केलं त्याची खात्री व्हीहीपॅटच्या माध्यमातून केली जाते. मतदार ज्या ईव्हीएम मशिनवर उमेदवाराच्या नावासमोर बटन दाबतो त्याचवेळी बाजूच्या व्हीव्हीपॅट मशिनवर उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असणारी स्लीप ७ सेकंदासाठी मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लीप कट होऊन बीप आवाज येतो. मात्र ही स्लीप मतदारांना मिळत नाही. ती सिलबंद पेटीत जमा होते.