डॉ. कलामांच्या चपला, नव्हे आधुनिक पादुकाच !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 03:51 PM2017-09-01T15:51:19+5:302017-09-01T19:07:44+5:30
पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रामेश्मवरम भेटीनंतर डॉ. कलाम यांच्या शिलॉंगच्या शेवटच्या प्रवासात वापरलेल्या चपलांचा फोटो ट्वीटरवर प्रसिद्ध केला आहे
रामेश्वरम, दि.1- भारताचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील स्मृतीस्थळाला पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी डॉ. कलाम यांच्या शिलॉंगच्या शेवटच्या प्रवासात वापरलेल्या चपलांचा फोटो त्यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केला आहे. डॉ. कलाम यांच्या साधेपणाबाबत सांगताना बेदी यांनी, 'या चपलांकडे पाहा, त्या दुरुस्त करुनही वापरल्या आहेत' असे ट्वीटमध्ये लिहिले आहे.
These Chappals of Dr Kalam were in the suitcase of his last journey to Shillong. ( See how worn out they were and had even been repaired) pic.twitter.com/XjJoxBjhNE
— Kiran Bedi (@thekiranbedi) September 1, 2017
डॉ. कलाम हे नेहमीच त्यांच्या साधेपणाबाबत ओळखले जात. अत्यंत साधी राहणी व तरुणांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत असे. किरण बेदी यांनी रामेश्वरम येथे डॉ. कलाम यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन प्रत्येक शाळेने आपल्या मुलांना या स्थळाची भेट घेण्यासाठी आणले पाहिजे, यामुळे शेकडो नवे कलाम घडतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अत्यंत साधेपणाने जगणाऱ्या कलाम यांनी देशाच्या विकासासाठी आयुष्य वेचले, त्यांनीच व्हीजन 2020 चे स्वप्न पाहिले आणि तरुणांनी या देशाचे नेतृत्व करावे असे त्यांना वाटे. असेही बेदी यांनी या भेटीनंतर मत व्यक्त केले आहे. युवकांसाठी आणि मुलांसाठी डॉ. कलाम हे महत्त्वाचे प्रेरणास्रोत होते असे सांगून नवा भारत घडविण्यासाठी अशा नव्या कलामांची देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
किरण बेदी या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल असून गेले दोन दिवस त्या रामेश्वरच्या भेटीवर होत्या. या भेटीमध्ये त्यांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली तसेच वार्ताहरांशीही संवाद साधला. त्यानंतर रामनाथस्वामी मंदिराचे दर्शन घेऊन त्यांचा दौरा समाप्त होणार आहे.