निवडणूक निकालांआधीच सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:54 AM2019-05-19T05:54:24+5:302019-05-19T05:54:51+5:30
चंद्राबाबू लागले कामाला । अनेक नेत्यांशी चर्चा, पंतप्रधान मोदी यांचे देवदर्शन सुरू
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे अंतिम टप्प्यातील मतदान सुरू होण्याच्या आधी आणि मतमोजणीला पाच दिवस शिल्लक असतानाच, विरोधकांच्या आघाडीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू जोरात कामाला लागले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर तेथून जवळच असलेल्या एका गुहेत ध्यानधारणेला बसले आहेत. ते उद्या, रविवारी बद्रिनाथला जाणार आहेत. त्यामुळे एकीकडे सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न, तर दुसरीकडे सत्ता टिकविण्यासाठी देवदर्शन असा प्रकार देशात सुरू झाला आहे.
चंद्रबाबाू नायडू यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव, बसपच्या सर्वेसर्वा मायावती, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव अशा अनेक नेत्यांच्या दिल्लीत व लखनौमध्ये भेटी घेतल्या आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आघाडीची तयारी सुरू केली. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची त्यांनी अलीकडेच भेट घेतली. एरवीही स्टॅलिन व जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे एच. डी. देवेगौडा हे काँग्रेसबरोबरच आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर रेड्डी डी. राजा व मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांचीही चंद्राबाबू यांनी दिल्लीत भेट घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्याच आठवड्यात भेटणारे चंद्राबाबू त्यांच्या संपर्कात आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विरोधकांच्या आघाडीत आल्यास आपली हरकत नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले असून, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी मला कोणताही नेता व पक्ष यांचे वावडे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
नायडू यांनी राहुल गांधी यांना विरोधकांच्या आघाडीसाठी रणनीती तयार करण्याची विनंती केली. विविध पक्ष व त्यांची धोरणे, विचारसरणी यांबाबत मतभेद असले तरी आतापासूनच किमान समान कार्यक्रम तयार करण्यात यावा आणि त्यावर २३ मे रोजी चर्चा करावी, असे त्यांनी राहुल गांधी यांना सुचविले. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी २३ मे रोजी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार असून, त्यात चंद्रशेखर रावही असू शकतील.
वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी त्या बैठकीला जाणार नाही, असे सांगण्यात येत आहे. नवीन पटनायक यांच्याशीही काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ बोलणी करीत आहेत. मात्र हे दोन्ही २३ रोजी बैठकीला येण्याची चिन्हे कमी आहेत. आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालही २३ मे रोजी लागणार असल्याने या नेत्यांना अनुक्रमे विजयवाडा व भुवनेश्वरबाहेर राहता येणार नाही. स्वत: चंद्राबाबूही कदाचित बैठकीला नसतील. मात्र त्याची पूर्वतयारी ते करीत आहेत.
लखनौमध्ये चंद्राबाबू नायडू यांचे अखिलेश यादव व मायावती यांनी अतिशय प्रेमाने स्वागत केले. आम्ही भाजपबरोबर कदापि जाणार नाही आणि आपल्या अप्रत्यक्ष कृतीनेही भाजपला मदत होणार नाही, असे त्या दोघा नेत्यांनी स्पष्ट केले. मायावती म्हणाल्या की, याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये भाजपचा लोकसभेचा उमेदवार पराभूत झाला होता. आता वाराणसीमध्ये जिथे पंतप्रधान मोदी लढत आहेत, तिथेही त्याची पुनरावृत्ती होईल.
कॉँग्रेस नेत्यांत चर्चा
भाकपच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पवार व राहुल गांधी यांची उद्या भेट होईल. राहुल माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी रणनीतीबाबत आज चर्चा केली. प्रसंगी काही विरोधी नेत्यांशी सोनिया गांधी वा डॉ. मनमोहन सिंग बोलतील व त्यांची मनवळवणी करतील, असे सांगण्यात येत आहे.