किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 07:33 PM2019-03-05T19:33:56+5:302019-03-05T19:37:48+5:30
बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे.
आसाम - बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. आज नाही तर उद्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे उघड होईलच मात्र यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी लावला.
बीएसएफच्या बॉर्डर प्रोजेक्टचे उद्धाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आसाम येथे गेले होते, त्यानंतर जनसमुदायला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली. आज नाही तर उद्या भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी समोर येईलच. पाकिस्तान आणि त्यांचे नेते यांना माहिती आहे किती दहशतवादी मारले गेलेत. त्याचसोबत नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाईजेशन (एऩटीआरओ) च्या सिस्टमने ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला त्या हल्ल्याच्या ठिकाणी 300 मोबाईल फोन नेटवर्क अँक्टीव असल्याची खात्री केली असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. यावर राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत आपले हवाई दल त्याठिकाणी जाऊन किती दहशतवादी मारले याची संख्या मोजत बसेल काय ? हा खेळ मांडला आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला. एनटीआरओ ही एक प्रामाणिक संस्था आहे,त्यांचे म्हणणे आहे की ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा त्याठिकाणी 300 मोबाईल नेटवर्क सुरू असल्याची माहिती मिळाली. हे मोबाईल फोन कोणत्या झाडाला लावले होते का ? की एनटीआरओवरही तुमचा विश्वास नाही अशी टीका केली
सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करू नका, तर देश निर्माण करण्यासाठी, देशाच्या विकासाचे राजकारण करा. काँग्रेसच्या माझ्या सहकारी मित्रांना एवढचं वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं आणि आपल्या हवाई दलाने किती दहशतवादी मारले याची संख्या मोजावी असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.