आसाम, बिहारमध्ये पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:53 AM2017-08-15T00:53:02+5:302017-08-15T00:53:06+5:30
आसाम, बिहार,पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून ५० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
नवी दिल्ली : आसाम, बिहार,पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून ५० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीफोनवरुन चर्चा केली. राज्याला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आसाममध्ये २१ जिल्ह्यातील २२.५ लाख लोकांना पुराचा फटका बसला असून आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेऊन असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने व्टिट केले आहे की, पंतप्रधान मोदी आणि आसामचे मुख्यमंंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यातील पूरस्थितीबाबत काल आणि आज चर्चा केली. दरम्यान, राज्यात मदतकार्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. प.बंगालमध्ये ५ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, नेपाळच्या चितवन या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात पुरामुळे २०० भारतीय पर्यटक अडकून पडले आहेत.
आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील पुराच्या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तरमधील रेल्वेसेवा सद्या बंद करण्यात आली आहे. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणव ज्योती शर्मा यांनी सांगितले की, देशाच्या विविध भागातून पूर्वोत्तरकडे जाणाºया रेल्वे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि पूर्वोत्तर भागात गत ७२ तासात मुसळधार पाऊस झाला आहे. काल २२ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साठल्यामुळे १४ रेल्वे विविध ठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. अलीपूरव्दार आणि कटिहार या विभागात अनेक नद्या दुथडी वाहत आहेत.
>योगी आदित्यनाथ यांनी केली हवाई पाहणी
बहराइच / गोण्डा : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोण्डा, श्रावस्ती, बलरामपुर बहराइच जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. पूरग्रस्त भागातील मदत कार्यात हयगय सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. बहराइचमध्ये ऐरिया गावात त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कर्नलगंजमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या दोन नागरिकांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपये दिले.
>उत्तराखंडात ढगफुटी, सहा जणांचा मृत्यू
पिथौरागढ : उत्तराखंडात पिथौरागढ जिल्ह्यात धारचूला भागात सोमवारी ढगफुटीच्या वेगवेगळ्या घटनात सहा जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना धारचूलाच्या नाउघाट भागात घडली. स्थानिक मंगती नदीला पूर आला आणि काही दुकाने व सैन्य शिबिर वाहून गेले. जिल्हाधिकारी आशीष चौहान यांनी सांगितले की, एनडीआरएफच्या तुकडीने घटनास्थळावरुन दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, सैन्याचा एक जवान बेपत्ता आहे. दुसरी घटना मालपा भागात घडली. येथे स्थानिक नदीला आलेल्या पुरात चार जण वाहून गेले. त्यांचे मृतदेह नंतर सापडले.
>अरुणाचलमध्ये परिस्थिती गंभीर
अरुणाचल प्रदेशात अंजाव, पूर्व सियांग आणि नमसाई जिल्ह्यात अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पूर्व कमेंग, पश्चिम सियांग भागात काही ठिकाणी पूरस्थिती आहे. अंजाव जिल्ह्यात भूस्खलनामुळे काही भागाचा संपर्क सात दिवसांपासून तुटला आहे.
>बिहारमध्ये पाणीच पाणी
पाटणा : बिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून चार जिल्ह्यात पूरस्थिती आहे. राज्यातील २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आणि केंद्राकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभागाच्या दहा तुकड्या देण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली आहे. याशिवाय हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे.