UPA सरकारमुळे 'चांद्रयान -2'च्या लाँचिंगला उशीर, माजी इस्त्रो अध्यक्षांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:29 AM2019-06-14T11:29:08+5:302019-06-14T12:29:12+5:30
भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते जी. माधवन नायर यांनी यूपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते जी. माधवन नायर यांनी यूपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहे. चांद्रयान-2 लाँच करण्याची योजना 2012 मध्ये झाली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह सरकारने याबाबत निर्णय घेण्यास विलंब केला. त्यामुळे चांद्रयान-2 चे लाँचिंग सात वर्षांनंतर झाले, असे जी. माधवन नायर यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अनेक योजनांवर जोर देण्यात आला. यामध्ये चंद्रयान-2 आणि गगनयान यांच्या सुद्धा समावेश होता. आता तर इस्त्रोने स्वत:चा स्वतंत्र अंतराळ तळ उभारण्याची भारताची योजना आखली आहे, असेही जी. माधवन नायर यांनी सांगितले. तसेच, यूपीए सरकारने 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी मंगळयान मिशन आणले होते. कारण, याचा फायदा निवडणुकीत घेता येईल, असा आरोप जी. माधवन नायर यांनी काँग्रेसवर केला आहे.
Former ISRO Chief & BJP leader G Madhavan Nair: Original plan was to launch Chandrayaan-2 in 2012 but due to some policy level decisions of UPA-2 government it was delayed. After Modi ji took over, he gave thrust to such projects, especially Gaganyaan & Chandrayaan-2. (13.6.19) pic.twitter.com/ul5vCei3Uo
— ANI (@ANI) June 14, 2019
जी. माधवन नायर हे 2003 ते 2009 पर्यंत इस्त्रोचे अध्यक्ष होते. त्यांचा पहिल्या मानवरहित चांद्रयान-1 मिशनमध्ये सहभाग होता. 22 ऑक्टोबर 2008 मध्ये चांद्रयान-1 लाँच करण्यात आले होते. दरम्यान,2012 मध्ये चांद्रयान-2 लाँच करण्याबाबत ऑगस्ट 2009 मध्ये जी. माधवन नायर यांनी निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या यूपीए सरकारद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे याला उशीर झाला. दरम्यान, आता दहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारताने चांद्र मोहीम हाती घेतली असून, चांद्रयान-२ चे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे.
चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. 15 जुलै रोजी पहाटे 2वाजून 51मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. यासंदर्भातील माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवान यांनी दिली आहे. दरम्यान, चंद्रावर जाणाऱ्या चांद्रयान-2 ची काही छायाचित्रे इस्रोने प्रसारित केली आहेत. चांद्रयान-2 मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लँडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही एमके lll अंतराळात घेऊन जाईल. विशेष म्हणजे हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे. चांद्रयान-2च्या लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान नाव देण्यात आले आहे. रोव्हर प्रज्ञानला लँडर विक्रमच्या आत ठेवण्यात येईल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे लँडिंग झाल्यानंतर त्याला बाहेर आणले जाईल.
भारताची पुढील महत्त्वाकांक्षा अंतराळात स्वत:च्या तळाची!
नजीकच्या भविष्यात स्वत:चा स्वतंत्र अंतराळ तळ उभारण्याची भारताची योजना असून यानाने पहिला अंतराळवीर अंतरिक्षात पाठविण्याची ‘गगनयान’ मोहीम ऑगस्ट 2022 मध्ये पार पाडल्यानंतर अंतराळतळाची योजना राबविण्याची तयारी जोमाने सुरू केली जाईल, असे भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी गुरुवारी सांगितले. ‘गगनयान’ मोहीम पार पडल्यानंतर अंतराळ तळ उभारणीच्या योजनेचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला जाईल. अंतराळात अल्प गुरुत्वाकर्षणात नानाविध प्रयोग करण्यासाठी आपलाही स्वतंत्र अंतराळ तळ असावा, ही भारताची महत्त्वाकांक्षा आहे. तिला मूर्त रूप देण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातील.