मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:07 AM2021-07-16T06:07:56+5:302021-07-16T06:10:36+5:30
गेहलोत, हुडांकडेही असेल मोठी जबाबदारी. काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगण्यात येते.
वेंकटेश केसरी
नवी दिल्ली : काँग्रेसला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावणारे ज्येष्ठ नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. २०२४ साली होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आतापासूनच पूर्वतयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच एक भाग म्हणून कमलनाथ यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते.
कमलनाथ यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेऊन पक्षाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते. काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्याकडे महत्वाची कामे सोपविली जाऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. मात्र गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्यालाच अधिक पसंती दिली तर कमलनाथ व हुडा यांच्यावर जास्त जबाबदारी देण्यात येऊ शकते.
राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याची इच्छा नाही. त्यामुळे कमलनाथ यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात येईल असे सांगण्यात आले. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांशी कनिष्ठ नेत्यांना नीट संवाद साधणे कठीण जात आहे. ही दरी बुजविण्याचे काम कमलनाथ करतील असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना वाटते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांची राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी निवड केली. ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान राखला जाईल हेच या निवडीतून दाखवून देण्यात आले. पक्षकार्यासाठी सर्वस्वी युवा नेत्यांवर विसंबून राहाणे सोनिया गांधी यांना पसंत नाही. नव्या-जुन्या नेत्यांच्या एकत्रित कामातून पक्ष प्रगती करेल अशी त्यांची धारणा आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात समाजातील विविध स्तरांतील नेते तसेच माजी सनदी अधिकारी आदींचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. या सोशल इंजिनिअरिंगमुळे काँग्रेसचाही कल आता सोशल मीडियातून लढण्यापेक्षा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याकडे वाढण्याची शक्यता आहे.
मुख्य काम समन्वयाचे
काँग्रेसमधील नाराज २३ ज्येष्ठ नेत्यांच्या गटाला जी२३ नावाने ओळखले जाते. त्यांच्याशी कमलनाथ उत्तम प्रकारे संवाद साधू शकतील असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना वाटते. कमलनाथ हे १९७७पासून नेहरु-गांधी घराण्यांशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी यांच्यासोबत काम केले आहे. अहमद पटेल यांनी अनेक वर्षे पक्षात व पक्षाबाहेरही समन्वयाचे जे काम केले तेच कमलनाथही उत्तम प्रकारे करू शकतील असा काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना विश्वास आहे.