सैन्य दिनी सीमेवर भारताची घातक कारवाई, पाकिस्तानचे सात सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 12:55 PM2018-01-15T12:55:26+5:302018-01-15T14:40:31+5:30
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाता भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे
श्रीनगर- पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पूंछ सेक्टरमध्ये भारताने केलेल्या गोळीबारात 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत तर चार सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानी सैन्याने या संदर्भातील माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं. याच्याविरोधात भारताने कारवाई केली आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील पूंछ सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला. यात पाकचे सात जवान ठार झाले. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ‘जैश- ए- मोहम्मद’च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात शनिवारी भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला होता. याविरोधात भारताने कारवाई करत पाकिस्तानच्या सात सैनिकांचा खात्मा केला आहे तर चार सैनिक जखमी झाले आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. आम्ही घटनास्थळावरून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आमच्या मते सहा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे, एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी वैद्य यांनी दिली आहे.