‘मित्रो’, मोदी आज पुन्हा करणार धक्कातंत्राचा वापर?, केंद्रीय मंत्री सांगणार नोटाबंदीचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 07:28 AM2017-11-08T07:28:48+5:302017-11-08T07:30:17+5:30
आज काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवले आहे.
मुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. भारताच्या इतिहासात 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस कोरला गेला. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा एका रात्रीतून चलनातून काढून घेतल्यानंतर त्याचे अनेक चांगले-वाईट परिणामही दिसले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 8 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्कातंत्राचा वापर करत आज आणखी एक मोठी घोषणा करणार आहेत मोदी-आमित शहा ही जोडी धक्कातंत्राचा वापर करण्यात पटाईत आहेत. त्यामुळे आज ते कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र हा धक्का सर्वसामान्यांच्या फायद्याचा की तोट्याचा हा काळवेळच सांगेल. पण गेल्या काही दिवसांपासून नोटाबंदी आणि जीएसटीवरुन सरकराला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे नोटाबंदीला एक वर्ष झाल्याचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री राज्यभरात नोटाबंदीचे महत्व समजावून सांगणार आहेत.
सोशल मीडियावर नोटाबंदीवरुन मोदी सरकारला केलं जाताय लक्ष -
8 नोव्हेंबर ही तारीख जसजशी जवळ येते, त्याप्रमाणे आता लवकरच नवा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील, असे मेसेज फिरत आहेत. याशिवाय, मोदींच्या भाषणाची ‘मित्रों’ ही शैलीही ट्रेंडमध्ये आहे. त्या दिवसाची आठवण करून देणारी ‘तुमको भूला ना पायेंगे’ या आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे.
अशी झाली नोटाबंदी -
8 नोव्हेंबर : काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी चलनातून पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. बँक खात्यांतून 4, तर एटीएममधून 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंधने.
जुन्या नोटा पेट्रोल पंप, सरकारी इस्पितळे, टोल आदी निवडक ठिकाणी 12 नोव्हेंबरपर्यंतच चालू शकणार. बँका आणि पोस्ट ऑफिसेसमध्ये जुन्या नोटा बदलून घेता येणार. बँका एक दिवस, तर एटीएम दोन दिवस बंद.
9 नोव्हेंबर : 2000 आणि 500 रुपयाच्या नव्या नोटा चलनात.
10 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांचा पहिला दिवस. 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर प्रचंड रांगा.
11 नोव्हेंबर : जुन्या नोटा भरण्यासाठी नागरिकांनी बँकांत प्रचंड गर्दी केली होती. एकट्या स्टेट बँकेत 53 हजार कोटी रुपये जमा झाले. आणखी तीन दिवस टोल फ्री प्रवासाची मुदत वाढवून देण्यात आली.
12 नोव्हेंबर : सुट्टीच्या दिवशी शनिवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या असल्या, तरीही गर्दी कायम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 30 डिसेंबरनंतर पुन्हा एकदा काळ्या पैसेवाल्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा इशारा.
13 नोव्हेंबर : बँक खात्यांतून पैसे काढण्याची मर्यादा 4 हजार 500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. एटीएममधून 2 हजार 500 रुपयांपर्यंत मर्यादेत वाढ. दुसर्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यावर 30 डिसेंबरपर्यंत कोणतेही शुल्क आकारणार नसल्याची घोषणा.
14 नोव्हेंबर : वीज बिल, पाणी बिल, पेट्रोल-डिझेल खरेदी, दूध केंद्रे, मेट्रो-रेल्वे तिकिटे, सार्वजनिक वाहतूक, घरफाळा, न्यायालयीन शुल्क, केंद्रीय भांडार, गॅस सिलिंडर या ठिकाणी जुन्या नोटा चालणार असल्याचे जाहीर करत सरकारने नागरिकांना दिलासा दिला.
15 नोव्हेंबर : जुन्या नोटा बदलून घेणार्यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय. तेच-तेच लोक नोटा बदलून घेत असल्याने गर्दी कमी करण्यासाठी उपाय. निवडणूक आयोगाकडून नाराजी.