गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत , सरकारी इतमामात झाले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 04:25 AM2017-09-07T04:25:04+5:302017-09-07T04:25:36+5:30
अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात मंगळवारी मरण पावलेल्या कर्नाटकातील पुरोगामी पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी धार्मिक विधी न करता, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बंगळुरू : अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात मंगळवारी मरण पावलेल्या कर्नाटकातील पुरोगामी पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी धार्मिक विधी न करता, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपा व हिंदुत्ववादाच्या विरोधात सातत्याने लिखाण करणा-या गौरी लंकेश यांच्या मारेक-यांच्या तपासासाठी कर्नाटक पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) ही चौकशी करेल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वीरप्पा मोईली यांच्यासह अनेक काँग्रेस, तसेच विरोधी नेत्यांनी त्या आधी गौरी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या अंत्ययात्रेत कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. अंत्ययात्रेत ‘गौरी लंकेश अमर रहे’ या घोषणा दिल्या जात होत्या. अंत्ययात्रेत बंगळुरूसह राज्यभरातील अनेक लोक सहभागी झाले होते. (वृत्तसंस्था)
तीन जणांनी सात गोळ्या झाडल्या
या आधी कर्नाटकातील धारवाडमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली होती. त्यांचे मारेकरी अद्याप सापडले नसल्याने, आपल्या बहिणीच्या हत्येची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी इंद्रजीत लंकेश यांनी केली आहे.
गौरी यांनी कर्नाटक भाजपाचे नेते प्रल्हाद जोशी यांच्याविरुद्ध लिखाण केले होते. त्यानंतर, जोशी यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्यात गौरी लंकेश यांना सहा महिन्यांची सजा झाली होती. त्या सध्या जामिनावर होत्या.
गौरी लंकेश (वय ५५) काल कार्यालयातून बंगळुरूमधील राजराजेश्वरी नगरातील त्या घरी परतताच, तिथे लपून बसलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या.
त्यापैकी दोन छातीत तर एक गोळी डोक्यात शिरली आणि त्या मरण पावल्या. त्यांच्या घराच्या व्हरांड्यात असलेल्या सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे मारेकºयांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे, तसेच डॉ. कलबुर्गी यांच्या व गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पद्धतीत साम्य दिसत असले, तरी आताच त्याबाबत निष्कर्ष काढता येणार नाही. गौरी यांच्या हत्येनंतर अप्रत्यक्षपणे काही जणांनी हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे लिखाण आज सोशल मीडियावर चालविले होते. त्यांचीही चौकशी करण्यात येईल. - सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
निषेध : गौरी लंकेश यांच्या हत्येचा सर्व राजकीय पक्षांनी, तसेच पत्रकारांच्या संघटनांनी, तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही गौरी यांच्या हत्येचा निषेध केला आहे. हत्येच्या निषेधार्थ नवी दिल्लीसह सर्व राज्यांमध्ये आज जोरदार निदर्शने करण्यात आली.