मोदींच्या "या" धाडसी पावलाचं बिल गेट्स यांनी केलं कौतुक
By admin | Published: April 26, 2017 01:54 PM2017-04-26T13:54:23+5:302017-04-26T14:02:55+5:30
खुल्या जागेत शौचास जाणा-या लोकांना प्रतिबंद घालण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेवर भर देत खुल्या जागेत शौचास जाणा-या लोकांना प्रतिबंध घालण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा समस्येवर आवाज उठवला आहे ज्याबद्दल आपल्याचा विचार करणेसुद्धा आवडत नाही. तीन वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी जनतेच्या आरोग्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली होती. ती आजतागायत कोणाच्याही तोंडून ऐकली नाही. आज त्याचा मोठा फायदा भारताला होतोय.
बिल गेट्स म्हणाले, आपण 21व्या शतकात राहतो. आजही आपल्या आया-बहिणी उघड्यावर शौचास जातात हे पाहून त्रास होत नाही का ? , गावातील अनेक महिला शौचास जाण्यासाठी रात्रीची वाट पाहतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल, त्यांना किती आजारांनी ग्रासलं असेल. आपण स्वतःच्या आया-बहिणींना डोळ्यांसमोर ठेवून शौचालय बांधू शकत नाही काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
माझ्या मते इतर कोणत्याही राष्ट्रीय नेत्यानं या संवेदनशील विषयावर इतक्या खुलेपणानं आणि सार्वजनिकरीत्या वाच्यता केली नाही. मोदींनी फक्त भाषणच दिलं नाही, तर विकासासाठी कामही केलं आहे. भाषणाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. त्याअंतर्गत 2019पर्यंत 7.5 कोटी शौचालय बांधण्याचा मोदींचा मानस आहे. तसेच त्यांनी खुल्यामध्ये कचरा फेकण्यासाठीही मनाई केली आहे. या समस्या सोडवून आपण हजारो जीव वाचवू शकतो. त्यामुळे मुली शाळेकडे आकर्षित होतील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल. सफाईची स्थिती मजबूत बनवण्यासाठी आमची फाऊंडेशन जोमाने काम करते आहे. भारत सरकारसोबत मिळून आम्ही यावर काम करतो आहोत, असंही बिल गेट्स म्हणाले आहेत.