जीवघेणी अंधश्रद्धा... पुढच्या जन्मी 'तो' मिळावा म्हणून 'गे' तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 01:55 PM2018-02-12T13:55:35+5:302018-02-12T14:20:17+5:30
यासाठी कालीमातेने एक उपायदेखील सांगितला होता.
भोपाळ: पुर्नजन्माच्या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भोपाळमधील एका तरूण संशोधकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नीलोत्पल सरकार (27) हा नॅनो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात संशोधन करत होता. नीलोत्पलने चिठ्ठी लिहून आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले होते. आपल्या गे जोडीदाराचा जीव वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे नीलोत्पलने चिठ्ठीत लिहिले आहे.
नीलोत्पल हा कालीमातेचा उपासक होता. भोपाळच्या अप्पर लेक नावाने ओळखण्यात येणाऱ्या तलावात त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने शर्टाच्या बाहीला स्वत:चे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर असलेला टॅग लावला होता. यावरून त्याने आत्महत्येची योजना विचारपूर्वक आखली होती, हे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जेणेकरून आपला मृतदेह आपल्या कुटुंबीयांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावा, अशी नीलोत्पलची ईच्छा असावी, असे पोलीस निरीक्षक राजकुमार गुप्ता यांनी म्हटले. नीलोत्पलने आत्महत्येपूर्वी 'फायनल नोट' या नावाने फेसबूक पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आपल्या खोलीतील भिंतीवर लावण्यात आलेल्या संदेशांचे चित्रण केले होते.
तसेच व्हिडिओत त्याने म्हटल्याप्रमाणे, 2016 मध्ये दिवाळीच्या काळात माझ्या स्वप्नात कालीमाता आली होती. स्वप्नात देवीने मला जे काही सांगितले, ती माझ्यासाठी चिरंतन आनंदाची गोष्ट होती. या गोष्टीबद्दल मी आतापर्यंत गुप्तता पाळली होती. कारण, ज्या दिवशी मी ही गोष्ट इतरांना सांगेन तो माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार होता. या स्वप्नात कालीमातेने मला सांगितले की, यंदाच्या वर्षात तुला आयुष्याचा जोडीदार मिळेल. जेव्हा तो माझ्या आयुष्यात येईल, त्यावेळी माझे आयुष्य आनंदाने भरून जाईल. तो माझ्याशी सेक्स करू शकत नाही, पण आम्ही एकमेकांना सुख देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. ज्या दिवशी मी त्याला प्रपोज करेन तो माझा शेवटचा दिवस असेल. त्या दिवशी त्याला समजेल की मी त्याच्यासाठी मरण पत्करले आहे. मी त्याला त्रास देऊ इच्छित नाही. सर्व काही गुपित राहील. त्याप्रमाणे 'तो' माझ्या आयुष्यात आला. मला त्याच्याशी लग्नही करायचे होते. पण ते या जन्मात शक्य नव्हते. यासाठी कालीमातेने एक उपायदेखील सांगितला होता. आम्ही या जन्मात एकमेकांना भेटू. परंतु, आमचे मीलन पुढच्याच जन्मात निश्चित आहे, असा दृष्टांत कालीमातेने मला दिल्याचे नीलोत्पलने पत्रात म्हटले आहे.
नीलोत्पल सरकार हा एका उच्चभ्रू कुटंबातील होता. यापूर्वी तो गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरात गेला होता. तेथून आल्यानंतर नीलोत्पलने आत्महत्येचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, त्याचा जीव वाचला होता. त्यानंतर नीलोत्पलवर मानसिक उपचार सुरू होते. मात्र, त्याने डॉक्टरांनी दिलेली औषधे कधीच वेळेवर घेतली नाहीत. दरम्यान, दुसऱ्या एका चिठ्ठीत नीलोत्पलने आपल्या मृतदेहाला जोडीदाराकडून अग्नी देण्यात यावा, अशी ईच्छा व्यक्त केली आहे.