गोरखालॅंड आंदोलनामुळे चहाच्या दराला उकळी
By अोंकार करंबेळकर | Published: August 3, 2017 01:51 PM2017-08-03T13:51:42+5:302017-08-03T14:52:58+5:30
दार्जिलिंग चहाच्या किंमतीमध्ये गेल्या महिन्याभरात 50 ते 100 टक्के वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर प्रिमियम क्वालिटीच्या चहाचे लिलावही बंद पडले आहेत.
मुंबई, दि.3- स्वतंत्र गोरखालॅंड राज्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुरु केलेले आंदोलन अजूनही थांबलेले नाही. हे आंदोलन सलग 45 दिवस सुरु असून त्याचा मोठा परीणाम चहाच्या उत्पादनावर झाला आहे. येथिल चहाच्या किंमतीमध्ये गेल्या महिन्याभरात 50 ते 100 टक्के वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर प्रिमियम क्वालिटीच्या चहाचे लिलावही बंद पडले आहेत.
या आंदोलनाचा पहिला परिणाम दार्जिलिंग आणि ईशान्य राज्यांमधील पर्यटनावर झालेला दिसून आला पण आता दार्जिलिंगचे प्रमुख उत्पादन असलेल्या चहावरही याचा परिणाम होत आहे. आंदोलनांमुळे दार्जिलिंगमधील 87 चहाचे मळे बंद झाले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत चहाचे उत्पादन घटले असून तुटवड्यामुळे किंमती मात्र वेगाने वाढत आहेत.
या आंदोलनाचा मोठा फटका या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर झालेला दिसून आला आहे. सर्व 87 मळ्यांमधील काम बंद करण्यात आल्यामुळे तेथे काम करणारे 75 हजार मजुरांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. 15 जूनपासून काम ठप्प झाल्यामुळे सर्व मळ्यांचे 250 कोटींचे नुकसान झाले आहे. तर संपुर्ण दार्जिलिंग परिसराचे 400 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दार्जिलिंगच्या परिसरातील लोकांचे जीवनमान पूर्णतः चहाचे उत्पादन आणि पर्यटनावर अवलंबून आहे. येथिल एकूण महसुलापैकी 90 टक्के उत्पादन हे चहा व पर्यटनातून येते. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या अर्थस्रोतावरच कुऱ्हाड कोसळल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे.
स्वतंत्र गोरखालॅंड राज्य मिळावे तसेच बंगाली भाषेचे आक्रमण थांबवण्यात यावे . या मागणीसाठी गोरखा जनमुक्तीने केलेल्या आंदोलनाचा परिणाम ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झालेला आहे. चिकन्स नेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि ईशान्य भारताला उर्वरित भारताला जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीवर हे आंदोलन सुरु आहे. या प्रदेशातूनच सिक्किमला सर्व अन्नधान्य, इंधनाचा पुरवठा होतो. मात्र आंदोलनामुळे सिक्किमचा सर्व पुरवठा ठप्प झाला आहे. यावर सिक्किमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सिक्कीमच्या पर्यटकांची संख्या 80 टक्के इतकी घटली आहे. सिक्किम सरकारने तर पश्चिम बंगाल सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली असून आमच्या अर्थव्यवस्थेचे 60 हजार कोटींचे नुकसान झाले आहे असे मत त्या सरकारने मांडले आहे.
दार्जिलिंग आणि चहाचं अतूट नातं...
भारतीय वैद्यक सेवेमध्ये सिव्हिल सर्जन पदावरती काम करणारे आर्थर कॅम्पबेल यांची 1839 साली काठमांडूवरुन दार्जिलिंगला बदली झाली. 1841 साली त्यांनी कुमाऊवरुन काही चहाची रोपं आणून दार्जिलिंगला लावली. 1847 साली त्यांच्या या कामाला वेग आला आणि येथे चहाची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. 1850 साली ब्रिटिशांनी व्यावसायिक पातळीवर लागवड आणि विक्री सुरु केली. सध्या दार्जिलिंगमध्ये 87 चहाचे मळे आहेत. त्यांना टी इस्टेट किंवा टी गार्डन्स असे म्हटले जाते. 17हजार 500 हेक्टर जमिनिवर होणाऱ्या लागवडीतून 90 लाख किलो चहाचे उत्पादन येथे होते. चहाबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिशांना दार्जिलिंगचा चहा विशेष आवडत असे. त्यामुळे इंग्लंडमध्येही दार्जिलिंग चहाला मानाचे स्थान मिळाले. सध्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या 50 टक्के जनतेचे उत्पन्न थेट या मळ्यांमधून येते. त्यामुळेच गोरखालॅंड आंदोलनाचा येथील अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला असेल याचा अंदाज येतो.