गुजरात विधानसभा निवडणूक - दलित आंदोलनाचा चेहरा जिग्नेश मेवानीचा 21 हजार मतांनी दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:13 PM2017-12-18T12:13:42+5:302017-12-18T12:31:38+5:30
गुजरातमधील दलित आंदोलनचा चेहरा असलेला युवा नेता जिग्नेश मेवानी यांनी 21 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बनासकंठा जिल्ह्यातील वडगाम-११ या विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवानी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते
अहमदाबाद - गुजरातमधील दलित आंदोलनचा चेहरा असलेला युवा नेता जिग्नेश मेवानी यांनी 21 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बनासकंठा जिल्ह्यातील वडगाम-११ या विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवानी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जिग्नेशने ट्विट करत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेससाठी आशेचे किरण असणारे जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. जिग्नेश मेवानीला आपचाही पाठिंबा होता.
रविवारी जिग्नेश मेवानीने भाजपाचा विजय होणार नसल्याचा दावा केला होता. एक्झिट पोल चुकीचे असून भाजपाचा पराभव नक्की आहे. त्यामुळे त्यांचं सरकार होणार नाही असं ते म्हणाले होते. जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर आणि हार्दीक पटेलच्या मदतीने भाजपाता पराभव करायची काँग्रेसची रणनीती होती.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. देशभरात भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संसदेत पोहोचतात व्हिक्टरी साईन दाखवत या निकालामुळे आपण आनंदित असल्याचं दाखवून दिलं.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत 182 मतदारसंघांचा कल हाती आला आहे. काँग्रेसने सुरुवातीच्या कलांमध्ये घेतलेली आघाडी भाजपाने मोडीत काढली असून, सध्याच्या कलांनुसार भाजपा 107 तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं होतं.