गुरमीत राम रहीम कैदी, त्याला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट नाही - के.पी.सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 10:44 AM2017-08-26T10:44:09+5:302017-08-26T10:49:24+5:30
काही वृत्तवाहिन्या, पेपर्स राम रहीमला विशेष वागणूक दिल्याच्या बातम्या दाखवत आहेत.
नवी दिल्ली, दि. 26 - साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम एक सामान्य कैदीच असून त्याला एसी, मदतनीस अशी चैनीची कोणतीही सुविधा दिलेली नाही असे हरयाणाचे तुरुंग अधिकारी के.पी.सिंह यांनी सांगितले. काही वृत्तवाहिन्या, पेपर्स राम रहीमला विशेष वागणूक दिल्याच्या बातम्या दाखवत आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करतो राम रहीम सुनारीया तुरुंगात आहे, कुठल्याही अतिथिगृहात नाही त्यामुळे त्याला कोणत्याही वेगळया सुविधा दिलेल्या नाहीत असे के.पी.सिंह यांनी सांगितले.
राम रहीमला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असून, त्याची अन्य कैद्यांपासून वेगळी खास व्यवस्था करण्यात आली आहे असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. राम रहीमला तुरुंगात पिण्यासाठी मिनरल वॉटरचे पाणी तसेच बाहेरुन जेवण मागवण्याची मुभा दिली असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले होते.
Some channels & papers reporting on special treatment to #RamRahim. I clarify he is in Sunaria Jail, not in a guesthouse-DG Prisons(Haryana) pic.twitter.com/GMDnqpImxB
— ANI (@ANI) August 26, 2017
तुरुंग अधिकारी के.पी.सिंह यांनी हे सर्व दावे खोडून काढले आहेत. सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी राम रहीमला दोषी ठरवताच पंजाब व हरयाणात त्याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक सुरू केली. या हिंसाचारात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून, 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. हिंसाचारात २00 हून अधिक वाहने, अनेक रेल्वे स्थानके, पेट्रोल पंप, टेलिफोन एक्स्चेंज, प्राप्तिकर कार्यालय, दूध प्रकल्प यांना आग लावली.
दिल्लीत एका ट्रेनच्या बोगीही पेटवली. या हिंसाचारामुळे पोलीस व सुरक्षा दलांनी तिथे आधी लाठीमार, नंतर पाण्याचा मारा व अश्रुधूर सोडला. तरीही हा जमाव त्यांच्या अंगावर येत होता. त्यामुळे अखेर केलेल्या गोळीबारात ३0 जण ठार व २५0 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
सोनिया-अमरिंदर सिंग चर्चा
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि राज्यात शांतता व सुव्यवस्था राखा असे आवाहन त्यांना केले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाब मंत्रिमंडळाची तातडीची बैठक शनिवारी सकाळी होणार आहे.
गृहमंत्री लगेच परतले
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग क्रिगिजस्तानच्या दौºयावर होते. तणावाची माहिती मिळताच ते तेथून तीन तास लवकर निघून दिल्लीस परतले. येताच त्यांनी पंजाब व हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आणि नंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ न त्यांना परिस्थितीची कल्पना दिली.
राष्ट्रपतींना दु:ख
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच सर्वांना शांततेचे आवाहनही त्यांनी केले आहे.