हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:42 PM2024-05-07T18:42:32+5:302024-05-07T18:42:56+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे.

Haryana BJP News : BJP government in Haryana in minority; 3 independent MLAs left support, supported Congress | हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा

हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा

Haryana BJP News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. हरियाणातील भाजप सरकारवर मोठे संकट कोसळले आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. हे तिन्ही आमदार आता काँग्रेसच्या बाजूने गेले आहेत. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत पुंद्री येथील अपक्ष आमदार रणधीर गोलन, निलोखेरीतील धरमपाल गोंदर आणि चरखी दादरी येथील सोमवीर संगवान यांनी पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. 

सरकारच्या धोरणांवर आपण खूश नसल्यामुळे भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे या तिन्ही अपक्ष आमदारांनी सांगितले. दरम्यान, अपक्ष आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणातील बहुमताचे गणित बिघडले आहे. 90 जागांच्या हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा 46 आहे. भाजपकडे 41 आमदार असून त्यांना 6 अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता. यापैकी तिघांनी आता पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे आता हरियाणातील सैनी सरकारकडे फक्त 44 आमदार शिल्लक आहेत.

आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांना म्हणतात की, "मला आताच ही माहिती मिळाली आहे. कदाचित काँग्रेस आता काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात गुंतली आहे. काँग्रेसला जनतेच्या इच्छेशी काहीही देणेघेणे नाही." तर, दुसकडे काँग्रेस खासदार दीपेंद्रसिंग हुडा म्हणाले, "राज्यातील (हरियाणा) परिस्थिती भाजपच्या विरोधात आहे, त्यामुळे बदल होणे निश्चित आहे. भाजप सरकारने बहुमत गमावले आहे." 

जेजेपी आमदार किंग मेकर ठरणार?
हरियाणातील या राजकीय गोंधळादरम्यान एकेकाळी भाजप सरकारचा मित्रपक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार किंग मेकर ठरू शकतात. कारण, जेजेपीचे 10 पैकी 7 आमदार सध्या त्यांच्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजप या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. विधानसभेत बहुमत चाचणी झाल्यास, हे 7 आमदार क्रॉस व्होटिंगद्वारे भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा मतदानापासून दूर राहून भाजपला विश्वासदर्शक ठराव मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांची संख्या कमी करण्यास मदत करू शकतात.

भाजप-जेजेपीमध्ये वाद
हरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजप आणि जेजेपीने युती करुन निवडणूक लढवली होती. निवडणुकीत भाजपला 41 तर जेजेजीला 10 जागा मिळाल्या. या दोघांनी चार वर्षांहून अधिक काळ एकत्र सरकार चालवले. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जेजेजीला बाजुला केले. तसेच, मनोहर लाल खट्टर यांना हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवून नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले. सैनी यांनीही 6 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता सरकार संकटात आले आहे.

Web Title: Haryana BJP News : BJP government in Haryana in minority; 3 independent MLAs left support, supported Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.