मानवी शरीर 400 वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे - बाबा रामदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 11:37 AM2017-09-23T11:37:22+5:302017-09-23T12:34:48+5:30
मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे मात्र आपण अयोग्य जीवनशैलीद्वारे आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य लवकर संपते असा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केला.
नवी दिल्ली, दि.23- मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे मात्र आपण अयोग्य जीवनशैलीद्वारे आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य लवकर संपते, असा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केला. चांगले अन्न आणि व्यायामाच्या मदतीने रोगमुक्त जीवन जगा, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना यावेळेस दिला.
१२ व्या नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रामदेव म्हणाले, "मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे, मात्र अतिरेकी अन्न व अयोग्य जीवनशैलीने आपण त्यावर अत्याचार करतो. आपण रक्तदाब, हृदयरोग आणि इतर आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य कमी करुन घेतो व उर्वरित वर्षे डॉक्टर व औषधांच्या मदतीने जगतो".
कर्करोग आणि इतर आजार होण्यामागे कमी झालेली प्रतिकारशक्ती हे कारण आहे. योगासनांच्या व प्राणायामाच्या मदतीने प्रतिकारशक्ती वाढवता येते असे सांगून आपण नेहमी चांगल्या गोष्टींचेच मार्केटिंग केल्याचे रामदेव यांनी सांगितले.भारत, मेक इन इंडिया आणि आयुर्वेद या तिघांचे मार्केटिंग करुन मी डाँक्टर आणि औषधांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगतो. योग्य आहार, सहा तासांची झोप आणि एक तास व्यायाम या तीन गोष्टींच्या मदतीने चांगले आयुष्य आपण मिळवू शकतो. रामदेव यांनी उपस्थितांना काही योगासनेही करुन दाखवली
अमित शाह यांनी ३८ किलो वजन कमी केले
बाबा रामदेव यांनी यावेळेस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा सदस्य अमित शाह यांनी योग्य आहार व योगासनांच्या मदतीने ३८ किलो वजन कमी केल्याचे सांगितले. "कालच मी अमितभाईंना भेटलो, दुपारच्या जेवणावर नियंत्रण ठेवून आणि रात्री उकडलेल्या भाज्या व सूप पिऊन त्यांनी ३८ किलो वजन घटवले आहे". असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.