सीमेवरील हजारो लोकांनी गावे सोडली, वस्त्यांत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:48 PM2017-09-23T23:48:34+5:302017-09-23T23:48:51+5:30
पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा आणि पूंछ जिल्ह्यात भारतीय सीमांवरील चौक्या, तसेच नागरी वस्त्यांवर रात्रभर गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान आणि पाच गावकरी जखमी झाले.
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा आणि पूंछ जिल्ह्यात भारतीय सीमांवरील चौक्या, तसेच नागरी वस्त्यांवर रात्रभर गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान आणि पाच गावकरी जखमी झाले. सीमावर्ती भागातील २० गावांना पाकिस्तानने लक्ष्य केल्याने, या भागातील शेकडो लोकांना घर सोडून जावे लागत आहे. गत काही दिवसांत अरणिया आणि आरएस पुरा या भागातील २० हजार लोकांनी गाव सोडले आहे.
अधिका-यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने अरणिया, आरएस पुरा आणि रामगढ सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळपासून गोळीबार सुरू
केला. गोळीबारात आरएस पुरा सेक्टरच्या सतोवाली गावात तीन लोक जखमी झाले. अरणिया सेक्टरमध्ये एक जण जखमी झाला. सांबाच्या रामगढ सेक्टरमध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. पूंछ भागात पाकच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी ५०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यांना शिबिरात ठेवले आहे.
पाकिस्तानने १३ ते १८ सप्टेंबर सातत्याने गोळीबार केला. दोन दिवसांनंतर, २१ तारखेपासून गोळीबार सुरू झाला आहे. त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या वर्षी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या २८५ घटना घडल्या आहेत. ही संख्या २०१६ मध्ये २२८ होती. सीमेवर सतत होणा-या गोळीबारामुळे अनिता कुमार यांच्यासारखी अनेक कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यांना गुरुवारी रात्री घरात पलंगाखाली लपून राहावे लागले. या गोळीबाराला त्रासून घर सोडण्याचा निर्णय त्यांनी शुक्रवारी घेतला. (वृत्तसंस्था)
वस्त्यांत शुकशुकाट
अरणियाच्या रस्ते आणि वस्त्यांत फारसे लोक दिसतही नाहीत. तिथे शुकशुकाट आहे. प्रीतम चंद यांनी सांगितले की, जर आम्ही घर सोडून गेलो नाही, तर पाक सैन्याच्या तोफगोळ्यांनी मारले जाऊ .
परिसरातील २० गावांत ही स्थिती आहे. या भागांतील ६० टक्के घरे गेला आठवडाभर तोफगोळ्यांच्या निशाण्यावर आहेत. पोलीस अधिकारी सुरिंदर चौधरी म्हणाले की, येथील सुमारे दहा हजार लोक घर सोडून गेले आहेत.
शमशेर सिंह म्हणाले की, आम्ही मृत्यूच्या छायेत जगत आहोत. मुलांना शिक्षण मिळत नाही. सडेतोड उत्तर देण्याचे वक्तव्ये सरकारकडून होतात, पण त्यानंतर पाककडून गोळीबार वाढतो.